Mumbai News : सही रे सही! मध्य मुंबईपासून दक्षिण मुंबईपर्यंत, नागरिकांच्या सेवेत येणार `हा` नवा रस्ता
Mumbai News : देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई शहराचा चेहरामोहराच मागील काही वर्षांमध्ये बदलला असून, येत्या काळात आणखी काही बदल मुंबईकरांचं आणि या शहरात येणाऱ्यांचं आयुष्य समृद्ध करणार आहेत.
Mumbai News : (Mumbai trans harbour link) एमटीएचएल अर्थात अटल सागरी सेतू, सागरी किनारा मार्ग किंवा कोस्टल रोड (coastal road), शहरातील महत्त्वाच्या भागांना जोडणारे मोठाले उड्डाणपूल या आणि अशा अनेक प्रकल्पांच्या उपलब्धतेमुळं शहरातील प्रवास कैक पटींनी सुकर झाला आहे. दर दिवशी मुंबईत ये-जा करणाऱ्यांमध्ये नोकरदार वर्गाव्यतिरिक्त पर्यटकांचाही मोठा आकडा असतो. परिणामी शहरातील लहानमोठ्या रस्त्यांवरही दर दिवसागणिक गर्दी वाढताना दिसत आहे. यावर उपाय आणि पायवाटेनं पुढे जात शहरातील एका भागापासून दुसऱ्या भागापर्यंत जाण्यासाठी म्हणून आता एक नवी संकल्पना अंमलात आणली जाणार आहे.
(BMC) मुंबई महानगरपालिका सध्या मुंबईकर आणि पर्यटकांसाठी विविध भागांमध्ये पादचारी मार्ग बांधत आहे. ( Mahim to worli fort) माहिम मच्छिमार कॉलनी ते वरळी किल्ला आणि (Mantralay to Badhwar Park) मंत्रालय ते बधवार पार्क या भागांमध्ये या पदपथाचं काम अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामुळं आता माहिमपासून बधवार पार्कपर्यंत मुंबईचा मोठा टप्पा पायी प्रवास करत अनुभवता येणार आहे हे खरं.
मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पालिकेला सदर प्रकल्पांच्या मदतीनं शहरातील पर्यटनला वाव देण्यासाठी प्रयत्न करण्यासंदर्भात सुचवल्याचं म्हटलं जात आहे. सध्याच्या घडीला वांद्रे येथे बँडस्टँड वेस्ट येथे साधारण 3 ते 4 किमी अंतराचा पादचारी मार्ग आहे, इथं येणारी बरीच मंडळी समुद्रावर जाण्याऐवजी याच मार्गावरून चालण्याचा आनंद घेताना दिसतात. त्याच धर्तीवर शहरातील माहिम ते वरळी किल्ला परिसरापर्यंत दर्शनीय भागातून पदपथ तयार करण्यात येत आहे. या अनोख्या रस्त्यावर आकर्षक रोषणाई, बैठकव्यवस्था आणि काही मोकळ्या जागांचीही व्यवस्था पालिकेच्या वतीनं करण्यात येणार आहे.
हेसुद्धा वाचा : Indian Railway : काय सांगता? कोकणात जाणाऱ्या वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द?
माहिम ते वरळीदरम्यानचा हा पादचारी मार्ग साधारण 9 किमी अंतराचा असणार आहे. तर, मंत्रालय ते बधवार पार्क येथील मार्ग तयार झाल्यानंतर तिथंही रोषणाई, बैठक व्यवस्था आणि मोकळी जागा अशा सुविधा पालिकेमार्फत पुरवण्यात येणार असून शहराती एक वेगळी बाजू अनुभवण्याची संधी मुंबईकरांसमवेत इथं पर्यटनासाठी आलेल्यांना मिळणार आहे. त्यामुळं मुंबईच्या एकंदर रुपात आता खऱ्या अर्थानं एक अनोखी भर पडणार असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.