मुंबई: एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर उत्तर मुंबईतील भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी आपल्या विजयोत्सवाच्या तयारीला सुरुवात केली आहे. गोपाळ शेट्टी यांना आपल्या विजयाची एवढी खात्री आहे की, त्यांनी बोरिवली एका दुकानात मिठाईची ऑर्डर दिली आहे. या दुकानाच्या मालकाने दिलेल्या माहितीनुसार, शेट्टी यांनी आम्हाला १५०० ते २००० किलो मिठाई तयार करण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता या दुकानातील कामगार युद्धपातळीवर कामाला लागले आहेत. या कामगारांमध्येही भाजपच्या विजयाचा आनंद ओसंडून वाहत आहे. हे कामगार मोदींचा मास्क घालून मिठाई बनवत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१४ मध्ये गोपाळ शेट्टी उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडून आले होते. त्यावेळी शेट्टी यांनी देशात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा मानही पटकावला होता. त्यामुळे यंदा गोपाळ शेट्टी यांच्यासमोर मैदानात कोणाला उतरवायचे, हा प्रश्न काँग्रेसला पडला होता. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनीही शेट्टी यांच्याविरोधात लढायला नकार दिला होता. अखेर काँग्रेसने अगदी शेवटच्या क्षणाला अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली होती. यावेळी गोपाळ शेट्टी यांच्यासाठी हे आव्हान अगदी सोपे असल्याची चर्चा होती. मात्र, भाजपच्या अपेक्षेपेक्षा उर्मिला मातोंडकर या राजकीयदृष्ट्या अधिक प्रगल्भ असल्याने या मतदारसंघातील लढतीला चांगलीच रंगत आली होती. उर्मिला मातोंडकर यांनी धडाक्यात प्रचार करत गोपाळ शेट्टी यांच्यासमोर आव्हान निर्माण केले होते. 



याशिवाय, मुंबईतील एकूण सहा मतदारसंघांपैकी याच मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले होते. तसेच येथील मतदानाचा टक्काही २०१४ च्या तुलनेत वाढला होता. त्यामुळे ही गोष्ट गोपाळ शेट्टींसाठी धोक्याची घंटा असल्याची चर्चा सुरु झाली होती. यापूर्वी उत्तर मुंबईतून अभिनेता गोविंदा याने भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांना धूळ चारली होती. त्यामुळे उर्मिला मातोंडकरही असा चमत्कार करणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.


मात्र, एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर गोपाळ शेट्टी यांनी सुटकेचा निश्वास टाकलेला दिसत आहे. या आकडेवारीवरून आपण पुन्हा निवडून येणार, अशी खात्री गोपाळ शेट्टी यांना पटलेली दिसत आहे. मला ऊर्मिला मातोंडकर यांचे कोणतेही आव्हान नसून यंदाही मी ५ लाखांपेक्षा अधिक मतांनी निवडून येईल, असा दावा गोपाळ शेट्टी यांनी केला आहे.