प्रशांत अंकुशराव, झी 24 तास, मुंबई : टेकनॉलॉजीनं अनेक कामं सोपी केली. आता वीजबिलही ऑनलाइन भरता येऊ लागलं. त्यामुळे महावितरण केंद्रावर जाण्याची फेरी वाचली. कोरोनामुळे ऑनलाइन पेमेंट करण्याचं प्रमाणही वाढलं. आता तुम्ही जर वीजबिल ऑनलाइन भरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना काळात अनेकांचे वीज बिल थकीत झाले आणि याचाच फायदा भामट्यांनि घेतला आणि महावीतरणाची बोगस वेबसाईट तयार करून त्याद्वारे लोकांना चुना लावयला सुरुवात केली. ज्यांचे वीजबिलाची थकबाकी आहे त्यांना वेबपोर्टलद्वारे मोबाईलवर मेसेज पाठवायचे आणि लिंक पाठवून त्याद्वारे पैसे उकळायचे हा धंदा सुरू झाला. 



या संपूर्ण प्रकरणी आता सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांच्या पथकाने ग्राहकांना बिल भरण्यासाठी आलेले संदेश आणि त्यांना पाठविण्यात आलेल्या लिंक यासगळ्याची पडताळणी केली. हे सर्व झारखंड इथून केले जात असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.


सायबर पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने रात्रीच्या वेळी छापा टाकून चरकू मंडल या झारखंड येथून आरोपीला अटक केली. मंडल याने आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने बनावट संकेतस्थळ तयार केले. त्यानंतर थकबाकी असलेल्या ग्राहकांना तो एसएमएस पाठवत असे आणि त्यात बिल भरण्यासाठी यामध्ये लिंक दिली जात होती. 


लिंकवर क्लिक केल्यावर बनावट संकेतस्थळ सुरू व्हायचे. संकेतस्थळ दिसल्याने ग्राहक ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करीत होते. मात्र हे पैसे महावितरणऐवजी खासगी खात्यामध्ये जात होते. त्यामुळे आपण पैसे भरताना महावीतरणाची वेबसाईट आहे का याची खात्री करा.