मुंबईत ऐन गर्दीत रेल्वे स्टेशनमधील सरकता जिना वर जाण्याऐवजी खाली आला आणि...
मुंबईत रेल्वे स्टेशनमधील सरकता जिना अचानक वर जाण्याऐवजी उलटा दिशेने आणि एकच गोंधळ.
मुंबई : एक धक्कादायक बातमी. पश्चिम रेल्वेवरच्या अंधेरी रेल्वे स्टेशनमधील सरकता जिना अचानक वर जाण्याऐवजी उलटा फिरल्याने प्रवासी एकमेकांवर आदळले. त्यात दोघेजण किरकोळ जखमी झालेत. अंधेरीच्या प्लॅटफॉर्म नंबर ३ वर सांताक्रुझ दिशेकडील सरकत्या जिन्यावर ऐन गर्दीच्या वेळी हा धक्कादायक प्रकार घडला.
सरकत्या जिन्याचा प्रवास उलट दिशेने सुरू असतानाच चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच काही प्रवाशांनी प्रसंगावधान राखत जिना थांबवण्यासाठी आपत्कालीन बटण दाबले. परिणामी जिना त्वरित थांबला. ही सर्व घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे.
देखभाल-दुरुस्तीअभावी हा सरकता प्रवास प्रवाशांसाठी धोकादायक ठरत असल्याचे सोमवारच्या घटनेवरून दिसून आले. उपनगरीय प्रवाशांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर सरकते जिने बसविण्यात आले असले तरी त्यातील बिघाडाच्या घटनाही वारंवार घडत आहेत.