मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी लॉकडाऊन संपणार का, या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी स्वरात देत फक्त काही बाबतीतच शिथिलता देण्यात येणार असल्याचं सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनलॉकचा टप्पा सुरु केल्यामुळं नागरिक मोठ्या संख्येनं बाहेर पडत आहेत. परिणामी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवाय विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहन नागरिकांना केलं. 


मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या आवाहनानंतर मुंबई पोलिसांनीही नागरिकांना उद्देशून काही निर्देश जारी केले. ज्यामध्ये त्यांनी नागरिकांना शहराअंतर्गत प्रवास करण्यासाठीची मार्गदर्शक तत्त्व सांगत कोरोनाच्या संकटसमयी काळजी घेण्याचं आवाहन केलं. 


विविध टप्प्यांमध्ये शहरात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. राज्यशासनाच्या आदेशावरुन हे अनलॉक होत असतानाच काहीजण मात्र नियम आणि अटींचं उल्लंघन करताना दिसत आहेत. त्यामुळं आम्ही मुंबईकरांना जबाबदारीनं वागत नियमांचं पालन करण्याचं आवाहन करतो, असं म्हणत मुंबई पोलिसांनी अतिशय महत्त्वाच्या गोष्टींकडे नागरिकांचं लक्ष वेधलं. मुख्य म्हणजे हे ट्विट पाहता घरातून बाहेर पडण्यापूर्वी नेमकं कोणते नियम पाळलं जाणं अपेक्षित आहे हे अधिक चांगल्या पद्धतीनं स्पष्ट होत आहे. 


मुंबई पोलिसांनी सांगितल्यानुसार...


- अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवांवर मोठ्या प्रमाणात निर्बंध 


- घराबाहेर पडल्यास मास्कचा वापर करणं अनिवार्य 


- घराबापासून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सलून, मंडई आणि दुकानांमध्ये प्रवासास परवानगी. त्यापलीकडील भागात प्रवेश निषिद्ध. 


- अत्यावश्यक सेवा आणि कार्यालयीन कामांसाठीच घरापासून २ किलोमीटर अंतरापलीकडील प्रवासास परवानगी. 


- कोणत्याही परिस्थितीमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलंच गेलं पाहिजे. 


- नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. 


- दुकानं आणि मंडईमध्येही नियमांचं पालन केलं जाणं सक्तीचं असेल अन्यथा त्यांच्यावर बंदी आणली जाईल. 



 


- रात्री ९ वाजल्यापासून पहाटे ५ पर्यंत संचारबंदी लागू असेल. 


- स्थानिक भागापासून दूरच्या अंतरावर कोणत्याही वैध कारणाशिवाय वाहनांची ये-जा दिसल्यास वाहन कायमस्वरुपी जप्त करण्यात येणार आहे.