31 वर्षांपासून पळत होता खुनातील आरोपी; पत्नीमुळे सापडला पोलिसांच्या जाळ्यात
Mumbai Crime News : मुंबई पोलिसांनी विरारजवळील नालासोपारा येथून 31 वर्षांनंतर एका खुनाच्या गुन्ह्यात वाँटेड असलेल्या व्यक्तीला अटक केली आहे. कांदिवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा आरोपी जामिनावर बाहेर आल्यापासून फरार होता.
Mumbai Crime : 31 वर्षांपासून खुनाच्या आरोपात फरार असलेल्या आरोपीला पकडण्यात मुंबईल पोलिसांना यश आलं आहे. 1992 मध्ये जामीन मिळाल्यानंतर फरार झालेल्या एका हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी 62 वर्षीय व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. खून प्रकरणात कोर्टातून जामीन मिळाल्यानंतर आरोपी गेल्या 31 वर्षांपासून पोलिसांपासून लपून फिरत होता.
एका खुनाच्या गुन्ह्यात वॉन्टेड असलेल्या आरोपीला तब्बल 31 वर्षांनंतर अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. एका अधिकाऱ्याने शनिवारी याबाबत माहिती दिली. आरोपीला पोलिसांनी पालघर जिल्ह्यातील नालासोपारा भागातून अटक केली आहे. दीपक भिसे असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर 1989 मध्ये राजू चिकना नावाच्या व्यक्तीचा खून आणि धर्मेंद्र सरोज नावाच्या व्यक्तीचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. दीपक भिसे 1992 मध्ये जामीन मिळाल्यानंतर फरार होता. जामीन मिळाल्यानंतर दीपक भिसे गेल्या 31 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.
भिसेला हत्या आणि हत्येच्या प्रयत्नात 1992 मध्ये जामीन मिळाला होता. मात्र या खटल्याच्या सुनावणीसाठी तa कधीही न्यायालयात हजर झाला नाही. 2003 मध्ये न्यायालयाने त्याला फरार घोषित केले होते. जेव्हाही पोलीस तुळसकरवाडी, कांदिवली येथील दीपक भिसे याच्या पत्त्यावर गेले, तेव्हा स्थानिक लोक सांगत की, तो अनेक वर्षांपासून येथे आला नाही. कदाचित तो जिवंत असेल किंवा नसेल माहिती नाही, असेही शेजारी सांगत. मात्र पोलीस त्याचा शोध घेत राहिले.
तपासादरम्यान, पोलिसांनी भिसेच्या पत्नीचा मोबाईल फोन नंबर मिळवला आणि त्याचा माग काढला. तेव्हा भिसे हा नालासोपाऱ्यात असल्याचे पोलिसांना कळाले. पोलिसांनी नालासोपाऱ्यात जाऊन भिसेचा शोध घेतला आणि त्याचे घर शोधून काढलं. त्यानंतर पोलिसांनी भिसेला शुक्रवारी रात्री पकडण्यात आले, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिसे हा कुटुंबासह नालासोपार परिसरात स्थायिक झाला होता. तिथे राहून तो झाडे तोडण्याचे कंत्राट घेत असत. 'आरोपी सध्या 62 वर्षांचा आहे, त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे,' असे कांदिवली पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक नितीन साटम म्हणाले.