धारावीत पोलिसांची धडक कारवाई; ८१ हजार सर्जिकल मास्क जप्त
या सगळ्या मुद्देमालाची किंमत १२,१५,००० इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुंबई: धारावी परिसरात बुधवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत सर्जिकल मास्कचा मोठा साठा हाती लागला. प्राथमिक माहितीनुसार, पोलिसांनी याप्रकरणी धारावीतील एका व्यक्तीला अटक केली. या व्यक्तीने ८१ हजार तीन पदरी सर्जिकल मास्क अवैधरित्या साठवून ठेवले होते. याशिवाय, त्याच्याकडून आणखी काही सामुग्री जप्त करण्यात आली होती. या सगळ्या मुद्देमालाची किंमत १२,१५,००० इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कोरोनाबाबत शास्त्रज्ञांचा इशारा, तर २ वर्ष लॉकडाऊन लागू करावे लागेल
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. या काळात काही व्यापाऱ्यांकडून जीवनावश्यक वस्तू आणि इतर गोष्टींचा काळाबाजार केला जात आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळात अशाच साठेबाजीमुळे राज्यात मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांनी साठेबाजांवर कारवाई सुरु केली होती. काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांनी एक ट्रक पडकला होता. या ट्रकमधून तब्बल १४ कोटी रुपये किमतीचे २५ लाख मास्क जप्त करण्यात आले होते. या कारवाईबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पोलिसांचे कौतुक केले होते.
सध्याच्या घडीला मुंबई हा देशातील कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. आज दिवसभरात मुंबईत कोरोनाचे १८३ नवे रुग्ण आढळून आले. तर दोघांचा मृत्यू झाला. मुंबईतील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १९३६ इतकी असून त्यापैकी ११३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १८१ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. , धारावी आणि इतर भागातील झोपडपट्टीच्या परिसरात वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण मुंबई महानगरपालिकेच्यादृष्टीने चिंतेची बाब आहे. यासाठी आता महापालिकेकडून लवकरच शहरातील हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी रॅपिड टेस्टला सुरुवात करण्यात येणार आहे.