मोठी बातमी! नाना पाटेकरांसह चौघांवर गुन्हा दाखल
तनुश्री बुरखा परिधान करून पोलीस ठाण्यात आली होती.
मुंबई: अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने बुधवारी ओशिवरा पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी नाना पाटेकर यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य, 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटाचे निर्माते सामी सिद्दिकी आणि दिग्दर्शक राकेश सारंग यांचा समावेश आहे. या चौघांविरोधात ३५४ आणि ५०९ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय गुन्हा नोंदविण्यात आलाय?
गुन्हा : स्त्रीला लज्जा वाटून तिला मानसिक धक्का बसावा या इराद्याने तिच्या अंगावर जाणे, बळजबरी करणे, स्त्रीला शीलभ्रष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा विनयभंग करणे
शिक्षेची तरतूद : ३ वर्षांच कैद आणि दंड
गुन्हा : लैंगिक उद्देशाने महिलेची छेडछाड, अंगविक्षेप करणे किंवा याच उद्देशाने एखादी वस्तू दाखवणे, एकांत स्थळी असताना लगट करणे
शिक्षेची तरतूद : शिक्षा १ वर्षापर्यंत कैद आणि दंड
अधिक वाचा : लैंगिक छळ हा शारीरिक, मानसिक आणि शाब्दिकही... हे तुम्हाला माहीत आहे का?
तनुश्री बुरख्यात...
तत्पूर्वी अभिनेत्री तनुश्री दत्ता बुधवारी रात्री नाना पाटेकर यांच्याविरुद्ध जबाब नोंदवण्यासाठी ओशिवरा पोलीस ठाण्यात आली होती. यावेळी तिने प्रसारमाध्यमांचा ससेमिरा टाळण्यासाठी बुरखा परिधान केला होता. पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला नाही, तर न्यायालयात जाण्याचा इशारा तिच्या वकिलांनी दिला होता. या प्रकरणी शनिवारी एक लेखी पत्र तिने पोलीस ठाण्यात दिले. त्याची दखल घेत महिला आयोगाने पोलिसांनी या प्रकरणी काय कारवाई केली, अशी विचारणा केली होती. तसेच गुरुवारी अॅडव्होटकेट नितीन सातपुते यांनी ४० पानी पुरावा पोलीस ठाण्यात वर्ग केला होता.
दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतल्यामुळे नाना पाटेकर यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच नाना पाटेकर प्रसारमाध्यमांसमोर आले होते. मात्र, वकिलांनी मला काहीही बोलण्यास मनाई केली आहे, असे सांगत नाना यांनी अवघ्या अर्ध्या मिनिटांत पत्रकार परिषद आटोपती घेतली होती. यामुळे नाना यांच्याभोवतीचे संशयाचे धुके आणखीनच गडद झाले होते.