मुंबई: भटक्या श्वानांना मांस खाऊ घालणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल; महालक्ष्मी मंदिराजवळ घडला प्रकार
मुंबईत महालक्ष्मी मंदिराच्या बाहेर भटक्या प्राण्यांना मांस खाऊ घालणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्यावर `प्रार्थनास्थळाची विटंबना` तसंच `धार्मिक भावना दुखावल्याचा` आरोप आहे.
मुंबईत महालक्ष्मी मंदिराजवळ भटक्या प्राण्यांना मांस खाऊ घालणाऱ्या 40 वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावदेवी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. महिलेवर 'प्रार्थनास्थळाची विटंबना' तसंच स्थानिकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा' आरोप ठेवण्यात आला आहे.
स्थानिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महापालिकेचे दोन पशुवैद्यकीय अधिकारी आणि दोन पोलिस अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली होती. या महिलेला भटक्या प्राण्यांना मांस खाऊ न घालण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, सूचनांचे पालन न केल्याने तिच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करम्यात आली. धार्मिक स्थळाचं नुकसान आणि अपवित्र करणे, शांतता भंग करणे आणि गुन्हेगारी धमकी देणे यासह कठोर कलमांतर्गत तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा देत दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही संबंधित महिलेला अद्याप अटक केलेलं नाही. आम्ही तक्रारदाराने दिलेली माहिती पडताळत आहोत. महालक्ष्मी आणि धाकलेश्वर मंदिरातील भाविकांच्या रांगा लागलेल्या असताना महिला मुद्दामून रस्त्यावर भटक्या प्राण्यांना मांस खाऊ घालत होती असा तक्रारदाराचा दावा आहे".
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सामाजिक कार्यकर्त्या शीला शहा यांच्या तक्रारीवरून नंदिनी बेलेकर आणि पल्लवी पाटील या दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नंदिनी बेलेकरवर धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने महालक्ष्मी मंदिराजवळील रस्त्यावर मांस टाकल्याप्रकरणी आणि पल्लवी पाटीलविरोधात तक्रारदार व इतर स्थानिक रहिवाशांना शिवीगाळ व धमकाविल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
या परिसरात महालक्ष्मी मंदिरासह अनेक मंदिरं आहेत. 2022 च्या सुरुवातीपासून स्वत:ला प्राणीप्रेमी म्हणवणाऱ्या नंदिनी बेलेकर मांजरी आणि कुत्र्यांना मटण, चिकन आणि मासे खाऊ घालत असल्याचा आरोप 62 वर्षीय तक्रारदाराने केला आहे. "अनेक भाविक मंदिरात अनवाणी जातात. त्यांना रस्त्यांवर अनेकदा मांसाचे तुकडे दिसतात. यामुळे मंदिराच्या आजुबाजूचा परिसर अपवित्र होतो. आम्ही नंदिनीला एकाच जागी प्राण्यांना खाऊ घालण्यास सांगितलं होतं. पण वारंवार सांगूनही ती मांजरी आणि श्वानांसाठी रस्त्यावर मांस, मासे फेकत होती," असं त्यांनी तक्रारीत सांगितलं आहे.
अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्यानंतर तपास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर समितीने नंदिनी बेलेकर भटक्या जनावरांना ठराविक ठिकाणी खाऊ आणि तेदेखील रात्री 10 नंतर खाऊ घालतील असं ठरवलं होतं. “तिला त्यांना मटण, मासे किंवा चिकनचे तुकडे न देण्यासही सांगण्यात आलं होतं आणि त्याऐवजी त्यांना कोरडे अन्न खायला देण्यास सांगितलं होते,” असं तक्रारीत सांगितलं आहे.
महिलेला परिसर स्वच्छ ठेवण्यास सांगितलं होतं. पण तिने सूचनांचं पालन केलं नाही. रहिवाशांनी तिला रोखलं असता तिने पल्लवी पाटीलला फोन केला. तिने रहिवाशांना शिवीगाळ करत खोटी तक्रार केली होती. यानंतर अखेर दोघींविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. तक्रारदारांनी पोलिसांकडे फोटो, व्हिडीओ सोपवले आहेत.