सांताक्रूझ येथे शस्त्रांचा धाक दाखवत एका सराफा व्यापाऱ्याला लुटण्यात आलं होतं. सराफा व्यापाऱ्याच्या घऱात दिवसाढवळ्या टाकण्यात आलेल्या या दरोड्यात 1 कोटी 43 लाखांचे दागिने लुटण्यात आले होते. यानंतर वाकोला पोलिसांनी तपास सुरु केला होता. अखेर 10 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींमध्ये व्यापाऱ्याच्या एका नोकराचा समावेश आहे. त्यानेच इतर सहकाऱ्यांच्या मदतीने दरोडा टाकल्याचं चौकशीत उघड झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बालूसिंह परमार, महिपाल सिंह, लेरुलाल उर्फ लकी भिल, मांगीलाल भिल आणि कैलास भिल अशी आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून दागिने आणि देशी बनावटीचं रिव्हॉल्वर जप्त केली आहे. 


19 जानेवारीला नरेश सोलंकी यांच्या सांताक्रूझमधील निवासस्थानी सकाळी 10.30 वाजता दरोडा पडला होता. बालूसिंह परमार हा त्यांचा माजी नोकर आहे. त्याने चोरी करुन पळ काढण्याआधी नरेश सोलंकी आणि त्यांच्या पत्नीला बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केली होती. बालूसिंह परमारने सहकाऱ्यांसह सोने आणि चांदीचे दागिने असा 1 कोटी 43 लाखांचा मुद्देमाल लुटून पळ काढला होता. वाकोला पोलिसांनी या दरोड्याची गंभीर दखल घेत तपासासाठी दोन पथकं तयार केली होती. 



वाकोला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "आरोपींना नरेश सोलंकी यांच्या इमारतीतील सातव्या मजल्यावर प्रवेश मिळाला होता. मुख्य आरोपी इमारतीच्या सुरक्षारक्षकांना ओळखत होता. बालूसिंह आपल्या दोन सहकाऱ्यांसह घरात शिरला. नरेश सोलंकी आंघोळ करत आहेत याची त्यांना कल्पना नव्हती. यानंतर त्याने नरेश सोलंकी यांच्या पत्नीला बंदूक दाखवत घरातील सर्व दागिने गोळा करुन आणण्यास सांगितलं". बालूसिंहला नरेश सोलंकी घऱात ऑर्डर करण्यात आलेली आणि गहाण ठेवलेले दागिने ठेवत असल्याची कल्पना होती. 


तक्रार मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम, पोलीस सहाय्यक आयुक्त जॉर्ज फर्नांडिस आणि वरिष्ठ निरीक्षक प्रकाश खांडेकर यांच्या नेतृत्वातील पथकाने पोलीस उपनिरीक्षक सुनील केंगर, सहाय्यक निरीक्षक रितेश माळी, उपनिरीक्षक फंडे यांच्यासह परमारच्या शेवटच्या पत्त्याच्या आधारे शोध सुरु केला होता. 


पालघरमध्ये दोन संशयितांना आणि गुजरातमधील वलसाडमध्ये एकाला अटक करण्यात आली होती. दरम्यान लुटीचा मुद्देमाल ज्याच्याकडे होता तो लेरुलाल त्याच्या मूळ गावी पळून गेला होता.


"आम्ही गुजरात आणि राजस्थानमध्ये 10 दिवस आरोपीचा शोध घेत होतो. आमच्याकडे अतिरिक्त कपडेही नव्हते. इतकी थंडी असताना आमच्याकडे गरम कपडे नव्हते," असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. हवामानाबरोबरच तेथील भूप्रदेशानेही पोलिसांसमोर आव्हान निर्माण केलं होतं. 


स्थानिक मदत करत नसल्याने राजस्थानमधील पोलीस पथकाने लेलुराम हत्या करुन पळून जात असल्याची अफवा पसरवली. “त्यानंतर स्थानिक पोलिस आणि माहिती देणारे नेटवर्क या प्रकरणाबद्दल अधिक गंभीर झाले आणि आम्हाला आरोपीला शोधण्यात मदत झाली,” असं अधिकाऱ्याने सांगितलं.


राजस्थानमध्ये गेलेल्या पथकात पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे, पोलीस उप-निरीक्षक सुनील अंकुशराव केंगार, पोलीस शिपाई शिवराय गोरखनाथ यादव, दीपक कचरू खरात, निलेश तुकाराम महाले, रामकिसन धोंडू बांबेरे, संतोष महादेव लोणे यांचा समावेश होता. 


आरोपींना शुक्रवारी रात्री पकडून शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. सर्व आरोपी 2 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत आहेत.