गुन्हेगारी कमी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी गुंड दत्तक योजना
. पोलीस चक्क गुंडांना दत्तक घेणार
प्रशांत अंकुशराव, मुंबई : मुंबईतली गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिसांनी दत्तक योजना सुरु केलीय. या योजनेअंतर्गत तब्बल १५ हजार गुंडांना पोलिसांनी दत्तक घेतलंय. या दत्तक योजनेमुळं गुंडांच्या तोंडचं पाणी पळालंय.
15 हजार गुंडांची कुंडली पालक पोलिसांजवळ
तुम्ही आतापर्यंत बाळ दत्तक घेणारे पाहिले असतील. पण आता मुंबई पोलिसांनी दत्तक योजना राबवली आहे. पण पोलीस बाळ दत्तक घेत नाहीत. पोलीस चक्क गुंडांना दत्तक घेतायत. गुंडांवर २४ तास नजर राहावी यासाठी पोलिसांनी आरोपी दत्तक योजना सुरु केलीय.
दत्तक आरोपीच्या हालचालींवर पालक पोलिसाची नजर असते. आरोपीचा दिनक्रम काय आहे? तो काय उद्योगधंदा करतो याचीही माहिती घेतली जाते. आरोपीच्या कुटुंबातील छोट्या मोठ्या घडामोडींचीही पालक पोलीस माहिती घेतो. आतापर्यंत 14 हजार 858 आरोपींना पोलीस कर्मचाऱ्यांनी दत्तक घेतलंय.
आरोपी गुन्हेगारीकडं वळत असल्यास त्याचं समुपदेशन करण्याची जबाबदारीही पालक पोलिसांवर आहे. तरीही तो ऐकत नसल्यास त्याचा अहवाल वरिष्ठांना सादर केला जातो.
दत्तक आरोपी आणि पालक पोलीस म्हटल्यावर हे नातं थोडं गुंतागुंतींचं आहे. दत्तक आरोपीनं थोडी जरी गडबड केली तर पालकाची सटकलीच समजा... त्यामुळं आरोपींची पालक पोलिसांमुळं बोलती बंद झाली आहे.