मुंबई : कोरोना Corona व्हायरसने चीनमधील वुहान शहरात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आणि पाहता पाहता साऱ्या जगभरात हा व्हायरस अनेकांसाठी धोकादायक ठरला. आजच्या घडीला कित्येक राष्ट्रांना कोरोनाचा विळखा बसला आहे. त्यामध्येच प्रत्येक राष्ट्राकडून कोरोनाशी लढण्यासाठी आणि या व्हायरसपासून नागरिकांना दूरच ठेवण्यासाठी काही उपाय योजण्यात येत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच मायानगरी मुंबईतही कोरोनाचे काही रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाची लागण रोखण्यासाठी म्हणून नागरिकांना आता थेट मुंबईच्या रक्षणकर्त्यांनी अर्थात मुंबई पोलीसांनी एक शायराना आवाहन केलं आहे.


ट्विटरच्या माध्यमातून मुंबई पोलीस शायरी करत कोरोनाविषयीची जनजागृती करत आहे. यासाठी राहत इंदौरी यांच्या 'वो बुलाती है मगर जानेका नही, या ओळींचा वापर केला जात आहे. मुख्य म्हणजे यासाठी एक फोटो पोस्ट केला असून, त्यावर चक्क इंदौरी दिसत आहेत. यामध्ये इंदौरी यांनीही मास्क लावल्याचं पाहायला मिळत आहे. 


गेल्या काही दिवसांपासून इंदौरी यांच्या याच ओळी विविध मीम्ससाठीही वापरल्या जात होत्या. हाच ट्रेंड लक्षात घेत आणि अतिशय लोकप्रिय अशा समाजमाध्यमाचा वापर करत मुंबई पोलीसांकडून हे पाऊल उचलण्यात आल्याचं दिसत आहे. त्यांचं हे ट्विट सध्या चर्चेचा विषय तर ठरत आहे, सोबतच कोरोनाविषयीचं गांभीर्यही अधोरेखित करत आहे. 


वाचा : 'आम्हाला क्वारंटाईन होऊन इतरांपासून दूर राहण्याची सुविधा नाही, पण...' 



 


अनेकांनीच मुंबई पोलिसांच्या या ट्विटला पसंती दिली असून, ते रिट्विटही केलं आहे. काहींनी मुंबई पोलिसांच्या या ट्विटर हँडलची प्रशंसाही केली आहे. 'कवी संमेलन एँड मुशायरा' यांचा हा फोटो पोस्ट करणाऱ्या, नेटकऱ्यांना कळेल अशा शैलीत आणि काहीशा त्यांच्याच अंदाजात पोलिसांचं हे शायराना आवाहन आता नागरिक गांभीर्याने घेतील हीच अपेक्षा आहे.