रोम: गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या corona कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दर दिवसागणिक वाढत चालला आहे. परिस्थितीचं गांभीर्य पाहता या व्हायरसचा विळखा बसलेल्या प्रत्येक राष्ट्राकडून काही कठोर पावलं उचलण्यात येत आहेत. या व्हायरसने बाधिक झालेल्यांचा आकडा कमी करण्यापासून ते अगदी गंभीर रुग्णांच्याही प्राणांना कोणताही धोका पोहोचवू न देण्यासाठी विविध राष्ट्रांच्या प्रशासनासोबतच युद्धपातळीवर कार्यरत आहेत ते म्हणजे असंख्य डॉक्टर, नर्स आणि काही स्वयंसेवी संस्था.
दिवसरात्र एक करत असंख्य रुग्णांच्या सेवेत रुजू असणाऱ्या या मंडळींना सध्या देवत्त्वच बहाल केलं जात आहे. जिथे सर्वसामान्य नागरिक क्वारंटाईन होत स्वत: या व्हायरसच्या प्रादुर्भावापासून दूर राहणअयाचा प्रयत्न करत आहेत. तिथेच ही मंडळी मात्र रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर आहेत. कामाच्या तासांची आकडेवारी करणाऱ्यांसाठी तर, या मंडळींनी एक वेगळाच आदर्श घातला आहे.
जबाबदारीने काम करणाऱ्या अशाच काही माणसातील देवदूतांना सोशल मीडियावरुन दाद देत त्यांचे मनापासून आभार मानले जात आहेत. जे आम्ही करु शकत नाही, ते करत तुम्ही माणुसकीला वेगळ्याच स्तरावर नेऊन ठेवलं आहे असं म्हणत डॉक्टर आणि परिचारिकांचे आभार मानले जात आहेत. वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनीही पूरी येथील समुद्रकिनारी एक सुरेख असं वाळूशिल्प साकारत त्यांचे आभार मानले.
My sand art at Puri beach, which shows the medical teams appeal citizen with the message "I stayed at work for you", "You stay at home for Us".#COVID2019 . #StayHome #StaySafe #SocialDistancing. #HelpUsToHelpYou pic.twitter.com/ZrucO4rtBz
— Sudarsan Pattnaik (@sudarsansand) March 19, 2020
एकिकडे हेच आभार मानले जात असताना, सोशल मीडिया वर एका नर्सची पोस्टही व्हायरल होत आहे. मुळची इटालियन भाषेत लिहिलेली ही पोस्ट nurse_org या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन भाषांतरीत स्वरुपात शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये कित्येक तास चेहऱ्यावर मास्क लावून, सुरक्षिततेचे उपाय म्हणून रुग्णालयातील ऍप्रन घालून काही अडचणींचा मसामना करुन तरीही तितक्याच समर्पकतेने काम करुन ही परिचारिका सर्वांसमोर आली आहे. आम्हाला आमचं काम करावं लागतच आहे, पण तुम्हीही तुमचं काम करा असं म्हणत तिने सर्वांनाच प्रतिबंधात्मक उपाय योजण्याचं आवाहन केलं आहे.
'मी एक परिचारिका आहे आणि आता माझ्यापुढे sanitary emergencyचं आव्हान आहे. मलाही भीती आहे. पण, जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करायला न मिळाल्याची नाही. पण, कामावर जायची. मास्क व्यवस्थित लागला नसेल तर, चुकून मी त्याला अस्वच्छ हात लावले तर, लेन्सने माझे डोळे सुरक्षित राहिले नाहीत तर... या साऱ्याची मला भीती आहे. मी शारीरिकदृष्ट्या थकले आहे. कारण, सुरक्षेच्या कारणासाठी वापरण्यात येणाऱी उपकरणं माझ्या शरीरालाही इजा पोहोचवत आहेत. कित्येकदा आम्हाला बऱ्याच वेळासाठी स्वच्छतागृहातही जाता येत नाही, सहा तासांसाठी पाणीही पिता येत नाही. गेल्या कित्येक आठवड्यांपासून या आव्हानात काम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांचीही हीच परिस्थिती आहे. पण, या सर्व गोष्टी आम्हाला आमचं काम करण्यापासून रोखू शकत नाही. मला माझ्या कामाचा प्रचंड अभिमान आहे आणि त्यावर माझं प्रेमही आहे.', असं तिने या पोस्टमध्ये लिहिलं.
पुढे, आम्हाला क्वारंटाईन होऊन घरी बसण्याची सुविधा नाही. मला कामावर जाऊन जबाबदारीने काम करावंच लागणार आहे. तेव्हा आम्ही आमचं काम करत आहोतच, पण तुम्हीही घरात राहून तुमचं काम करा. मी तुम्हाला कळकळीची विनंती करते असं म्हणत या परिचारिकेने वास्तवाची जाणिव प्रत्येकाला करुन दिली.
चीन, इराण, इटली, अमेरिका, भारत अशा सर्वच राष्ट्रांमध्ये कित्येक मंडळी रुग्णांच्या सेवेत तत्पर आहेत. त्यांना अपेक्षा आहे ती फक्त नागरिकांच्या सहकार्याची आणि खूप साऱ्या सकारात्मक उर्जेची.