मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट वाढत आहे. कोरोना शहरातून गावात पोहोचला आणि तर झोपडपट्टीतही कोरोनाची लागण झआली आहे. तसेच दिल्लीतल्या धार्मिक कार्यक्रमाला गेलेल्यांकडून राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाची बाधा पोहोचली आहे. असे असताना त्यांनी पुढे येऊन माहिती देण्याची गरज होती. मात्र, दिल्लीत गेलेल्यांनी आपली माहिती लपवली. त्यामुळे माहिती लपवल्याप्रकरणी १५० जणांवर मुंबईच्या आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीतील तबलिगच्या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्यांनी माहिती न लपविता समोर येऊन महानगरपालिकेला हेल्पलाईन आधारे कळविण्याचे आवाहन करण्यात आले होते. अन्यथा वेगवेगळ्या कलमांतर्गत कारवाई केली जाईल असा इशारा मुंबई पोलिसांनी दिला होता. तरीही अनेकांनी आपली माहिती लपवल्याचे पुढे आले आहे.



दिल्लीत धार्मिक कार्यक्रमला जाऊन कोरोना सारख्या भयानक साथीचा रोग पसरवायला मदत केल्याबद्दल, तसेच माहिती लपवल्याबद्दल महापालिकेच्यावतीने अग्निशमन दलाने हा गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार १५० जणांविरोध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


COVID-19 चा प्रसार रोखण्यासाठी, दिल्लीमधील आयोजित तबलीग़ी मरकजचा भाग असलेल्या सर्वांनी मुंबई महापालिकेच्या हेल्पलाईन क्रमांक १९१६ वर प्रवासाची तपशील माहिती द्यावी अशी विनंती मुंबई पोलिसांनी केली आहे. असे न केल्यास आयपीसी, आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग कायद्यातंर्गत कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट संकेत दिले होते.


दरम्यान, दिल्लीतील या कार्यक्रमाला राज्यातले १४०० लोक गेले होते. त्यापैकी ५० जणांनी मोबाइल बंद ठेवला असल्याने त्यांच्याशी अजूनही संपर्क झाला नसल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. या लोकांनी स्वतःहून प्रशासनाशी संपर्क साधावा अन्यथा कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.