पोलिसांनाही `बेस्ट` तिकीट काढावं लागणार...पगारात मिळणार `हा` भत्ता
मुंबई पोलिसांनाही 1 जूनपासून बेस्टच्या प्रवासासाठी सर्वसामान्यांप्रमाणे तिकीट काढावं लागणार आहे.
मुंबई पोलिसांना आता यापुढे बेस्ट बसमधून प्रवास करायचा असेल तर तिकीट काढावंच लागणार आहे. 1 जूनपासून हा निर्णय लागू होईल.
बेस्टने पोलिस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे मोफत पास देऊ नयेत, असं मुंबई पोलिसांनी बेस्ट प्रशासनाला कळवलंय. त्यामुळे पोलिस दलामध्ये नाराजीचे चित्र आहे.
पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास करता येत होता. ड्यूटीवर हजर होताना, घरी जाताना किंवा अन्य काही कामासाठी बेस्टच्या बसमधून प्रवास करण्यासाठी पोलिसांना मोफत पास दिला जात होता. बेस्ट प्रशासनाने बिलं पाठवल्यानंतर पोलिस प्रशासनाकडून ही रक्कम दिली जात होती. मात्र 1 जूनपासून ही पद्धत बंद करण्याचा निर्णय मुंबई पोलिस आयुक्तांनी घेतला आहे.
बेस्ट बसचा मोफत प्रवास बंद करून पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सरसकट प्रवासखर्च मिळावा, यासाठी वेतनामध्येच प्रवासभत्ता देण्यात येणार आहे. मात्र हा भत्ता नक्की किती असेल, हे समजू शकलेलं नाही. मात्र पोलिसांनाही येत्या 1 जूनपासून बेस्टच्या प्रवासासाठी सर्वसामान्यांप्रमाणे तिकीट काढावं लागणार हे मात्र नक्की