मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला होणाऱ्या विरोधाची धार दिवसेंदिवस तीव्र होताना दिसतेय. आज देशभरात आंदोलन सुरुय. महाराष्ट्रात देखील ठिकठिकाणी आंदोलनं झाली. मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावर नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. राजकीय पक्ष, तरुण आणि बॉलिवूड सेलिब्रेटींचाही सरकारविरोधात हल्लाबोल पहायला मिळाला. नागपुरात मुस्लिम बांधवांनी विधिमंडळावर मोर्चा काढला. राज्यात कायदा लागू होऊ देणार नाही असं आश्वासन काँग्रेस नेते वडेट्टीवारांनी मोर्चेकऱ्यांना दिलं. औरंगाबादच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एनसीआर आणि सीएए कायद्यासाठी दोन संघटना आमनेसामने आल्यात. तर मालेगावात नागरिकत्व कायद्याविरोधात लाखोंचा मोर्चा निघाला होता. काहीही झालं तरी कायदा लागू होऊ देणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतलाय. 


आंदोलनात सेलिब्रिटींचाही सहभाग

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातली धर्मनिरपेक्षता कायम राहायला हवी, आपण सगळ्यांनी एकत्र राहण्याची शपथ घेतलीय. ती पाळायला हवी, असं यावेळी अभिनेत्री स्वरा भास्कर हिने म्हटलंय. स्वरा ऑगस्ट क्रांती मैदानातील मोर्चात सहभागी झाली होती. 



नागरिकत्व कायदा आणि एनआरसीला विरोध करण्यासाठी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात मोर्चा निघाला. या मोर्चात काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष सहभागी आहेत. काँग्रेस नेते नसीम खान, मिलिंद देवरा, सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्यासह अभिनेत्री स्वरा भास्कर, हुमा कुरैशी, अभिनेता सुशांत सिंह, फरहान अख्तर आदी सेलिब्रिटींचाही मोर्चात सहभाग होता.


फोटो सौजन्य : सोशल मीडिया

याशिवाय या मोर्चात मोठ्या प्रमाणात विद्यार्थीही सहभागी आहेत. काळे टिशर्ट आणि लाल रिबीन बांधून 'टाटा इन्स्टीट्यूट ऑफ सोशल सायन्स'चे विद्यार्थी सहभागी झालेत.