अरे व्वा! ऐन पावसाळ्यात शिवनेरीचा अटल सेतूवरून प्रवास; पुणे- मुंबई अंतर गाठा `इतक्या` वेळात...
Atal Setu Shivneri : एखादा चित्रपट संपायच्या आधीच तुम्ही मुंबईत पोहोचणार... तिकीट दरातही मिळणार सवलत... पाहा सविस्तर वृत्त
Atal Setu Shivneri : मुंबई ते पुणे प्रवास (Mumbai to Pune) करणाऱ्यांचा आकडा मोठा असून, मागील काही वर्षांमध्ये हा आकडा सातत्यानं वाढताना पाहायला मिळाला. याच धर्तीवर प्रवाशांचा गरजा लक्षात घेत रेल्वेपासून एसटी (ST Bus) महामंडळांनंही या मार्गावर अधिक वाहनांची सुविधा उपलब्ध करून दिली. अशा या पुणे, मुंबई- मुंबई- पुणे प्रवासाचा अतिश. महत्त्वाचा टप्पा आता सुरु होणार असून, त्यामुळं प्रवासाची वेळ मोठ्या फरकानं वाचणार आहे. यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे तो म्हणजे देशातील सर्वात मोठा सागरी उड्डाण पूल, अर्थात अटल सेतू.
दर दिवशी पुण्यातून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या नोकरदार वर्गाला यामुळं फायदा होणार आहे. कारण, एसटी महामंडळाच्या वतीनं स्वारगेट- मंत्रालय - स्वारगेट अशी (Shivneri Bus) शिवनेरी बस सेवा नुकतीच सुरु करण्यात आली आहे. मंगळवारपासून सुरु झालेल्या या बस सेवेअंतर्गत सदरील प्रवास मार्गावर सोमवार ते शुक्रवार या दिवसांदरम्यान शिवनेरी धावणार असून, अटल सेतूमार्गे ती निर्धारित स्थळी पोहोचणार आहे.
काय आहेत तिकीटाचे दर?
स्वारगेट- मंत्रालय- स्वारगेट शिवनेरीचं फुल तिकीट 565 रुपये, तर हाफ तिकीट 295 रुपये इतकं आहे. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात 65 ते 75 टक्क्यांची सवलत असून, 75 वर्षांवरील नागरिकांना या प्रवासात 100 टक्के सवलत दिली जाणार आहे.
प्रवासाच्या वेळेत बचत...
मुंबई आणि नवी मुंबईमधील अंतर अवघ्या काही मिनिटांवर आणणाऱ्या या अटल सेतूमुळं पुण्यापर्यंतचं अंतरही एका अर्थी कमी झालं आहे. प्रवासी वाहनांसाठी अर्थात एसटी बससाठीही हा सेतू सुरू करण्यात आला आणि त्याला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. ज्यानंतर मंत्रालय आणि त्या परिसरात नोकरीसाठी असणाऱ्या अनेकांकडूनच अटल सेतूवरून स्वारगेट- मंत्रालय मार्गावरही बस सेवेची मागणी करण्यात आली.
हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : किमान दिलासा! मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार; कोकणात मुसळधार पावसाचा इशारा
पुणे- मुंबई अशा दैनंदिन प्रवास करणाऱ्या आणि त्यातूनही थेट मंत्रालयाच्या दिशेनं जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे वगळता इतर कोणताही पर्याय उपलब्ध नसल्यामुळं ही मागणी करण्यात आली होती. ज्यानंतर आता अटल सेतूवरून धावणारी शिवनेरी थेट मंत्रालय परिसरामध्ये पोहोचणार असल्यामुळं मंत्रालयासह या भागात असणाऱ्या कैक सरकारी कार्यालयांमध्ये नोकरीस रुजू असणाऱ्यांना याचा थेट फायदा मिळणार आहे. जिथं अडीच ते तीन तासात मुंबई गाठणं शक्य होत आहे.