मुंबई : मंगळवारी अतिवृष्टीने मुंबईला झोडपून काढताना जलमय करुन टाकले. त्यामुळे मुंबईच्या वाहतुकीचे तिनतेरा वाजले आणि धावणाऱ्या मुंबईला फुल स्टॉप लावला. मुंबईची लाईफ लाईन समजणारी रेल्वे तब्बल १५ तासानंतर सुरु  झाली खरी, मात्र कुर्ला येथे ही सेवा खंडीत झाली. त्यामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांना सलग दोन दिवस मनस्ताप सहन करावा लागला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्ये रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही उद्घोषणा करण्यात येत नव्हती त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना कसे घरी पोहोचायचे हा प्रश्न होता. अनेकजण मंगळवारपासून अडकून होते. दादर, परेल, सीएसएमटी येथे अडूक होते. काल बुधवारी लोकल सेवा सुरु झाली. मात्र, कुर्लाच्या पुढे एकही गाडी जात नसल्याने अनेकांची रखडपट्टी झाली. तर ठाणे, कल्याणकडून येणाऱ्या लोकल कुर्लापर्यंत येत होत्या. त्यापुढे जात नव्हत्या. त्यामुळे कुर्ला येथे प्रचंड गर्दी झाली होती. अनेक जण पटरीवरुन चालत होते. तर काही जण मिळेल त्या वाहनांचा आसरा घेत होते.


दरम्यान, कुर्ला येथे मंगळवारी पाण्यात फसलेल्या चार ते पाच लोकल गाड्या बंद पडल्या होत्या. त्या बाजुला करणे कठिण काम होते. धिम्या आणि जलद मार्गावर या गाड्या अडकून होत्या. तांत्रिक अडचणीमुळे गाड्या हलविण्यात येत नव्हत्या. दुपारी लांबपल्ल्याच्या गाडीचे इंजिन आणण्यात आले. या इंजिनाद्वारे लोकल हलविण्याची कसरत करावी लागली. तोपर्यंत तीन वाजले. रेल्वे इंजिनाला दोन-दोन लोकल जोडून त्या मुंबई सीएसएमटीच्या दिशेने ओढून नेण्यात आल्या. तोपर्यंत संध्याकाळचे ५ वाजले. त्यानंतर मध्य आणि हार्बरची वाहतूक हळूहळू सुरु झाली.



हार्बरची रखडपट्टी सुरुच होती. पनवेल ते कुर्ला अशी वाहतूक सुरु होती. मात्र, २० ते ३५ मिनिटांनी गाड्या धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. तर मध्य रेल्वे मार्गावर तिच परिस्थिती होती. २५ ते ३० मिनिटांनी गाड्या धावत होत्या.