मुंबईत संततधार, कांजूरमध्ये रेल्वे रुळावर पाणी
दृष्यमानता कमी झाल्यामुळे हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
मुंबई : मुंबई आणि उपनगरात गेल्या एक तासांपासून संततधार सुरू आहे. गेल्या तासाभरात मुंबई आणि उपनगरात २० मिमी पाऊस झाला आहे. गेले दोन दिवस मुंबईत पाऊस बरसला नव्हता. मात्र आज पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. साकीनाका, चेंबूर, घाटकोपर, कुर्ला इथे पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईत सर्वत्र ढगाळ वातावरण आहे.अधेमधे पावसाच्या सरी येतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही ठिकाणी सकाळी आलेल्या मुसळधार पावसाने पाणी साचलं तर काही ठिकाणी वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागले आहे. दृष्यमानता कमी झाल्यामुळे हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
पावसामुळे मध्य रेल्वेच्या कांजूर स्थानकात रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. मध्य रेल्वेची वाहतूक सुरूय मात्र गाड्या उशिराने धावत आहेत. कांजूर मार्गवरून घाटकोपरला येताना रुळ पाण्याने भरलेत. जलद आणि धीम्या गाड्या थांबून थांबून जात आहेत.