मुंबई : मुंबईला मंगळवारी झालेल्या जोरदार पावसाने चांगलेच झोडपले. बुधवारी पावसाचा जोर कमी झाल्याने अनेक ठिकाणी शिरलेल्या पाण्याचा निचरा झालाय. त्यामुळे मुंबईतील वाहतूक पूर्वपदावर येती आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, पुढच्या दोन दिवस आणखी पाऊस वाढण्याचा अंदाज काल हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे आज घराबाहेर पडताना विचार करावा लागणार आहे. महत्वाचे काम असेल तरच बाहेर पडा अन्यथा घरीच थांबावे असे आवाहन करण्यात येत आहे. 


येत्या काळात मोठ्या पावसाची शक्यता वर्तवल्यामुळे मुंबईकरांनी खबरदारीचे उपाय घेण्याची गरज आहे. लोकल वाहतूक काल दिवसभर बंद होती, रस्ते वाहतूकही पाणी साचल्यामुळे कोलमडली होती. गुडघाभर, तर काही ठिकाणी छातीपर्यंत पाण्यातून वाट काढत मुंबईकर घरचा रस्ता जवळ करत होते.


पावसाचा जोर कमी झाल्यामुळे आज सकाळी रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. मात्र पावसाचा जोर वाढण्याचा इशारा हवामान खात्यान दिला आहे. त्यामुळे पुन्हा कालची स्थिती उद्भवू शकते. अशात घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला जातोय. लोकल वाहतूक कोलमडल्यानंतर ऑफिसहून घरी जाण्यासाठी अडचणी येतील. त्यामुळे गरज असेल, तर ऑफिसला जावं.


दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा केली. त्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण टळणार आहे.