Mumbai Rains : मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार हजेरी, उपनगरात काय परिस्थिती?
Maharashtra Weather Update : राज्यात सुरु असणारं अवकाळी पावसाचं सत्र काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. आता हा पाऊस थेट मुंबईपर्यंत येऊन पोहोचला असून, पोटापाण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांच्या नाकी नऊ आणताना दिसत आहे.
Mumbai Rains : सोमवारच्या प्रखर सूर्यकिरणांच्यां दिवसानंतर मुंबईकरांची मंगळवारची सकाळ काहीशी अनपेक्षित होती. कारण, मंगळवारी पहाटेपासूनच ठाणे, गोरेगाव, बोरिवली भागात पावदानं दमदार हजेरी लावली. तर पुढील काही क्षणांतच हा पाऊस दादर, परेल आणि दक्षिण मुंबईच्या दिशेनं सरकताना दिसला. वीजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट, त्यात पावसाच्या सरी अशीच एकंदर परिस्थिती असल्यामुळं नोकरीसाठी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना काही अडचणींचा सामना करावा लागला. (Mumbai Rain Maharashtra Weather Update latest Marathi news)
मुंबईच्या पश्चिम उपनगरात मंगळवारी अवकाळी पावसानं हजेरी लावली. बोरिवली, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी या भागात अचानक पावसाच्या सरी बरसू लागल्या. याशिवाय विक्रोळी, घाटकोपर परिसरातही हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. ठाणे जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळल्या. ठाण्यात पहाटेपासूनच दमदार पाऊस झाला. पहाटे 4 वाजल्यापासूनच ठाण्यात पाऊस कोसळत होता. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह ठाण्यात पाऊस झाला. या पावसामुळे हवेत गारवा आल्याचं जाणवलं. साधारण साडेसहाच्या सुमाराला पावसाचा जोर ओसरला असला तरीही काही भागांत मात्र काळ्या ढगांची चादर आणि पावसाची रिमझीम अद्यापही सुरुच आहे.
हेसुद्धा वाचा : Gudi Padwa च्या मुहूर्तावर वर्षातील पहिला हापूस आंबा विकत घेत आहात, अस्सल हापूस ओळखायचा तरी कसा?
नवी मुंबईतही पावसाची हजेरी पाहायला मिळाली. मंगळवारी सकाळी नवी मुंबईतील बहुतांश भाग पावसानं ओलाचिंब झाला. तर, तिथे कल्याण- डोंबिवली भागातही पावसानं सर्वांचीच त्रेधातिरपीट उडवली.
मुंबईत कुठून आला अवकाळी पाऊस ?
हवामान खात्याच्या माहितीनुसार कमी दाबाच्या पट्ट्यामुळं पावसासाठीचं पूरक वातावरण तयार झालं. अरबी समुद्रावरून पश्चिमी वारे आद्रतेन वाहत असल्याने मुंबई शहर आणि उपनगर परिसरांसह आसपास पावसानं हजेरी लावली. शहरात पावसाच्या हजेरीनंतर आता पुढील काही दिवस निरभ्र आकाश पाहायला मिळेल असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार...
हिमालयाच्या पश्चिमेला असणाऱ्या झंझावातामुळं दिल्ली, एनसीआरसोबतच संपूर्ण उत्तर भारतात हवामानात काही बदल अपेक्षित आहेत. ज्यामुळं तापमानात काही अंशांची घट नोंदवली जाऊ शकते. पुढील दोन दिवसांतील किमान घट नोंदवल्यानंतर पुन्हा एकदा तापमानाचा आकडा वाढू लागेल अशीही शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्येही पावसाची हजेरी असून, उत्तराखंड, हिमाचलच्या काही भागात बर्फवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अवकाळीमुळं राज्यात पिकांचं मोठं नुकसान
अवकाळीमुळे राज्यात पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली आहे. ज्यामध्ये 25 जिल्ह्यांना बराच फटका बसला आहे. अवकाळीमुळं 1 लाख 39 हजार हेक्टरवर नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.