मुंबई : जोरदार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कोणीही घाबरुन जाऊ नका. जे लोक जिथे आहेत तिथेच राहण्याचा प्रयत्न करावा, प्रवास करु असे आवाहन करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळ मुंबईकरांचे हाल, अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक ठप्प, घरी  जाणाऱ्यांचे हाल झालेत. कोणतेही वाहन नसल्याने घरी कसे पोहोयचे असा प्रश्न त्यांना सतावतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांनी दुपारी साडे तीनच्या सुमारास मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावरील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली. यावेळी त्यांनी  मुंबई शहरात कुठल्या ठिकाणी पाणी तुंबले आहे, झाडे पडली आहेत, कोणी जखमी झाले का, .वाहतुकीची तसेच दळणवळणाच्या स्थितीची माहिती करून घेतली. मुख्यमंत्र्यांनी स्वत: हॉटलाईनवरून संपर्क साधला.


 


मुंबई शहरात २५ ठिकाणी पाणी तुंबल्याच्या तक्रारींची नोंद झाली असून मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षाकडे झाडे पडल्याच्या तक्रारींची संख्या वाढली आहे. मात्र सुदैवाने त्यामुळे कुणीही जखमी झाल्याची घटना घडलेली नाही, असे मुख्यमंत्र्यांनी परिस्थीतीचा आढावा घेतला. 


मुंबईत सकाळपासूनच पावसाचा जोर पहायला मिळाला. पाच दिवसांच्या गणपती विसर्जनाची एकीकडे लगबग सुरू असताना पावसाने, मात्र विश्रांती घेतलीच नाही.  साकीनाका परिसरात पावसामुळे पाणी साचलं होतं. त्यामुळे तिथली रस्ते वाहतूक मंदावल्याचं चित्र पहायला मिळालं. तर, घाटकोपरमध्येही अनेक सखल भागांमध्ये पाणी तुंबल्यामुळे परिसरातील नागरिकांचे हाल झालेत. तर, भांडुपच्या एलबीएस मार्गावर पाणी साचल्याने, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे तीन तेरा वाजले होते.  ठाण्यात गेल्या 8 तासांमध्ये 64 मि.मी. पाऊस झाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील २४ तासांमध्ये अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीसाठी 1800 222 108 किंवा 022-25371010  या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय.


जोरदार पावसामुळे दळणवळणाच्या साधनांवर परिणाम झाला आहे. मुंबईतील लोकल सेवा तातडीने सुरू करण्यासाठी प्रयत्न  सुरु आहेत. तुंबलेले पाणी उपसा करण्यासाठी मोठ्या क्षमतेचे पंप लावण्यात आले आहेत.  त्यामुळे परिस्थिती लवकर पूर्वपदावर येण्यास मदत होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेय.


दरम्यान, भारतीय हवामान खात्याने दुपारी १.०० वाजता दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील ४ तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, अलिबाग, डहाणू व भोवतालच्या परिसरात अतिवृष्टी होणार आहे.  त्याच बरोबर पुढील ४८ तासात उत्तर मध्य महाराष्ट्र व उत्तर कोकणासाठी अतिवृष्टीचा हवामान खात्याने इशारा दिलेला आहे.



 
सद्यस्थितीत सुरु असलेल्या पावसाचा प्रतिकूल परिणाम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर झालेला आहे.  मंत्रालयातील व दक्षिण मुंबईतील शासकीय कार्यालयातील बहुतांश अधिकारी कर्मचारी पश्चिम रेल्वे, मध्य व हार्बर रेल्वे  तसेच बसद्वारे प्रवास करत आहेत.  


भारतीय हवामान खात्याने दिलेला इशारा तसेच सद्यस्थितीत सुरु असलेल्या पावसामुळे  उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करून मंत्रालयातील व बृहन्मुंबईतील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना आज दुपारी २.३० वाजता कार्यालया सोडण्यास अनुमती देण्यात आली.