Mumbai Rain Latest Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या (Maharashtra, Vidarbha) पट्ट्यात गेल्या काही दिवसांपासून थैमान घालणाऱ्या पावसानं मुंबईलाही चांगलाच दणका दिल्याचं पाहायला मिळत आहे. बुधवारी मध्यरात्रीपासूनच शहरात पावसानं जोरदार हजेरी लावली. वीजांच्या कडकडाटात आणि वादळी वाऱ्याच्या साथीनं अगदी मान्सूनच्या दिवसांत बरसतो तसा हा पाऊस बरसला. हा अनपेक्षित पण, सूचित हवामान बदल पाहून शहरातील नागरिकही हैराण झाले. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कोणत्या भागाला पावसाचा फटका? बुधवारी रात्रीपासून मुंबईच जोरदार पावसानं हजेरी लावली. ज्यामुळं हवेत गारवा पसरला, तर काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडीत झाल्याचीही माहिती समोर आली. मध्यरात्रीनंतर झालेल्या या वादळी वाऱ्यांसह आलेल्या जोरदार पावसामुळं काही भागांमध्ये झाडं पडण्याच्या घटना घडल्या. पश्चिम उपनगराला या पावसाचा मोठा फटका बसला, काही भागांमध्ये घरांवरील पत्रेही उडून गेले. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड या भागांमध्ये जोरदार पाऊस झाला, तर पश्चिम द्रुतगती मार्गावर पाणी तुंबल्याचं पाहायला मिळालं.


राज्यातही अवकाळीचा जोर वाढला 


हवामान खात्यानं नुकत्याच जारी केलेल्या इशाऱ्यानुसार राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पावसाची हजेरी असेल. किंबहुना गेल्या आठ ते दहा दिसांपासून राज्यात अवकाळी पावसाचा जोर दिवसागणिक वाढताना दिसत आहे. येत्या काही दिवसांमध्ये राज्यात मध्य महाराष्ट्रासह कोकण आणि मराठवाड्यात पुन्हा एकदा अवकाळीचं थैमान पाहायला मिळणार आहे. 


हेसुद्धा वाचा : Heat wave in Maharashtra : राज्यात एप्रिल महिन्यात पारा चाळीशीपार, पाच जिल्हे तापले


 


पावसासह राज्यात गारपीटीचाही तडाखा बसणार असल्यामुळं याचे थेट परिणाम शेतपिकांवर दिसून येणार आहेत. इथं मागील आठ दिवसांपासून सुरु असणाऱ्या अवकाळीमुळं नाशिकमध्ये कांद्याचं मोठं नुकसान झालं आहे. केळी, संत्र, आंबा, द्राक्ष या फळांनाही अवकाळीचा फटका बसला आहे. तर, ज्वारी, हरभरा, गहू या रब्बी पिकांचंही मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. 


कोणत्या राज्यांत एप्रिल महिन्यात पावसाचं थैमान? 


स्कायमेटच्या अंदाजानुसार महाराष्ट्राप्रमाणं देशभरातही पावसाची हीच परिस्थिती पाहायला मिळणार आहे. केरळच्या दक्षिण किनारपट्टीवर पावसाची जोरदार बॅटींग पाहायला मिळेल. तर, गुजरातचा दक्षिण भाग, गोवा आणि कोकणातही हेच चित्र असेल. अरुणाचल प्रदेशातही पावसाच्या हलक्या सरी बरसणार असल्यामुळं वातावरणात गारवा पसरेल. यादरम्यानच्या काळात ताशी 30 ते 35 किमी वेगानं वारे वाहणार असल्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे.