दीपाली जगताप-पाटील, झी मीडिया, मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने एमबीबीएसच्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना दिलासा दिलेला नाही. पुढील वर्षीपासून आरक्षण लागू होणार असल्याचा आदेश दिल्यावर आज मराठा समाजातले वैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थी आणि डीएमईआर संचालक डॉ. तात्याराव लहाने यांची बैठक झाली. आता हे विद्यार्थी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला रवाना झालेत. चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजातले नेते आणि विद्यार्थी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. विद्यार्थ्यांना आहे तो प्रवेश देण्यात यावा अशी मागणी मराठा नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे केलीय. तर आता आम्ही आत्महत्या करावी का असा भावनिक प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी मराठा समाजातील एमबीबीएसला शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी गुरुवारी रात्री उशिरा १२.०० वाजल्याच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या निवासस्थानाबाहेर गर्दी केली होती. यावेळी त्यांनी भेटीसाठी वेळ देण्याची मागणी केली होती. आज होणाऱ्या मुख्यमंत्र्यांसोबतच भेटीत ते आपलं म्हणणं मांडणार आहेत. 


वर्षाबाहेर विद्यार्थ्यांची गर्दी

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रीया नव्याने करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता मराठा आरक्षणातील प्रवेशाच्या जागा खुल्या प्रवर्गात समाविष्ट होतील. त्यामुळे आता नव्याने होणाऱ्या प्रवेश प्रक्रीयेतील प्रवेशाच्या जागांची संख्या किती आहे पाहूयात... 


सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात  50% प्रवेशाच्या जागा ऑल इंडिया कोटा अंतर्गत पार पडल्या आहेत. 


उर्वरित 50 टक्यांत प्रवेशाच्या एकूण जागा - 972


खुल्या प्रवर्गात (ओपन) - 389


SC, ST, NT, VJ, OBC - 486


आर्थिक दुर्बल सवर्ण (EWS) - 97


खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशाच्या एकूण जागा - 460


व्यवस्थापन कोटा - 211


खुला प्रवर्ग - 110


SC, ST, NT, VJ, OBC-  115


आर्थिक दुर्बल सवर्ण (EWS) - 24



वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश आता गुणवत्तेवर आधारित यादीनुसार होतील. मग मराठा डॉक्टरांचे आंदोलन कशासाठी? 


- राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने यंदा मराठा आरक्षणानुसार प्रवेश दिले


-  पण मराठा आरक्षण लागू करण्याची घाई केली नसती तर मराठा विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे खुल्या प्रवर्गात प्रवेशासाठी अर्ज केला असता 


- यामध्ये 50% ऑल इंडिया कोट्यांतर्गतही प्रवेश अर्ज भरुन गुणवत्ता यादीनुसार प्रवेश झाले असते. यात ज्या मुलांची टक्केवारी कमी आहे त्यांना देशातील कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेता आला असता


- पण आरक्षणामुळे विद्यार्थ्यांनी मराठा राज्यातच प्रवेश मिळत असल्याने ऑल इंडिया कोटा अंतर्गत मिळत असलेली प्रवेशाची संधी वापरली नाही


-  राज्यात नव्याने होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत प्रकिया अनेक मराठा विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू शकतात