मुंबई : मुंबईकरांच्या आवडीच्या खाद्यपदार्थांपैकी एक समजला जाणारा विब्स ब्रेड आता दिसेनासा झाला आहे. ब्रेड उत्पादन करणाऱ्या इराणी कुटुंबीय़ांमध्ये वादाची ठिणगी पडल्यामुळे मुंबईतील असंख्य सँडविच स्टॉलवर असणारे विब्स ब्रेड काही दिवसांपासून नाहीसे झाले आहेत. 'मुंबई मिरर'च्या वृत्तानुसार जवळपास १९ सप्टेंबरपासून ही बाब समोर आली आहे. वेस्टर्न इंडिया बेकर्स प्रायवेट लिमिटेड या कंपनीकडून या उत्पादनाची निर्मिती करण्यात येते ज्यामध्ये तीन भावांची भागिदारी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तीन भावांची भागीदारी असली तरीही, होशँग इराणी यांच्या निधनानंतर सर्वात मोठे भाऊ खोदादाद इराणी यांनी ही भागीदारी रद्द करण्यात यावी यासाठी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 


या सर्व प्रकरणाशी संबंधीत वकीलांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खोदादाद इराणी यांनी ही याचिका सर्वात धाकटा भाऊ शेरियार इराणी यांच्यासोबत झालेल्या वादानंतर दाखल केली होती. खोदादाद हेच विब्सचे सर्व व्यवहार पाहतात. गुप्ततेच्या अटीवर वकिलांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार उत्पादन बंद होण्याचा व्यावसायिक बाबींशी संबंध नसून, कौटुंबीक कलहामुळेचा ही परिस्थिती उदभवली आहे. याचिकाकर्त्यांच्या माहितीनुसार इतर भागीदारांनी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना चुकीची वागणूक दिली होती. 


सध्याच्या घडीला आर्बीट्रेशन क्लॉज अंतर्गत खोदादाद इराणी यांनी या भागीदारीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर उच्च न्यायालयाने मध्यस्ती समिती स्थापन केली आहे. ज्यांच्या मदतीने या वादावर तोडगा निघू शकेल. पण, शेरियार इराणी यांनी या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला असल्याचंही कळत आहे. 


मुंबईच्या सँडविच स्टॉलवर सर्वत्र दिसतो विब्स ब्रेड 


डॉकयार्ड रोड येथे स्थित विब्स ब्रेडची खरी ओळख ही मुंबईत मिळणाऱ्या सँडविचमुळेही आहे. अनेक ब्रेड वितरकांच्या माहितीनुसार संपूर्ण बाजारपेठेत सुमारे ४६ टक्के भाग हा हा विब्सने व्यापलेला आहे. तर, त्यांचं स्लाईस ब्रेडचं ९० टक्के उत्पादन हे मुंबईतील सँडविच विक्रेत्यांना विकलं जातं. मुंबई आणि नवी मुंबईत विब्सचे कारखाने आहे, ज्यामध्ये जवळपास तीन हजार कर्मचारी कार्यरत आहेत. शिवाय जवळपास ६८ वितरकांकडून हे ब्रेड सर्वांपर्यंत पोहोचतात. ज्यांच्यामार्फत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या काही तरुणांच्या हाताशी रोजगार आहे.