मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत आणि रामदास कदम यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. संजय राऊत राज्यपालांना भेटून आल्यानंतर एक फाईल त्यांच्याजवळ होती. या फाईलची चर्चा व्हावी, अशीच त्यांची इच्छा होती आणि झालंही तसंच. राज्यपालांची भेट घेऊन आल्यानंतर संजय राऊत आणि रामदास कदम पत्रकार परिषदेसाठी येत होते. यावेळी कदमांच्या हातामध्ये एक जाडजुड फाईल होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फाईलकडे संजय राऊत यांचं अजिबात लक्ष नव्हतं असं नाही... त्यांनी खुर्चीवर बसण्यापूर्वी एक-दोनदा फाईलकडे नजर टाकली होती. पण मग खुर्चीमध्ये सेटल झाल्यावर राऊतांनी अचानक फाईलकडे लक्ष गेल्यासारखं केलं. आणि फाईल गाडीत ठेवायला सांगितली. त्यावेळी कदमांनीही जीभ बाहेर काढून आपली चूक झाल्याचं दाखवलं.


मी अचानक लक्षा आल्यासारखं करतो. तुम्हीही चुकल्यासारखं दाखवा, असा हा प्रकार आहे का? पण हे करत असताना राऊतांनी एक चोरटी नजर समोर टाकली आणि त्यामुळे त्यांची अॅक्टिंग पकडली गेली. या फाईलची मीडियामध्ये चर्चा व्हावी, अशी तर राऊतांची इच्छा नव्हती ना... मग या फाईलमध्ये काय आहे? आमदारांची यादी आहे की काय? राऊतांनी राज्यपालांना कसली फाईल दाखवली? एक ना अनेक... आणि त्यांच्या अपेक्षेप्रमाणे काही माध्यमांमध्ये तशी चर्चा झालीही. 


ही फाईल दाखवायची नव्हती पण दुर्दैवाने ती फाईल समोर आली. लवकरच त्या फाईलमध्ये काय होतं? याबाबत खुलासा करु, असं संजय राऊत नंतर म्हणाले. चांगला अभिनेता हा चांगला नेता होईलच असं नाही... पण चांगल्या नेत्याला चांगला अभिनेता असावंच लागतं, हे मात्र खरं.