दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या मंत्र्यांची बैठक घेतली. महाविकासआघाडीचं सरकार पाच वर्ष टिकवायचं असेल तर योग्य समन्वय ठेवा, असा सल्ला पवारांनी या मंत्र्यांना दिला आहे. तसंच वादग्रस्त मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्य टाळा, अशा सूचनाही पवारांनी मंत्र्यांना दिल्या आहेत. कोणताही निर्णय घेताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी समन्वय ठेवा, असं शरद पवारांनी मंत्र्यांना सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भीमा-कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणाचा तपास एनआयएकडे द्यायचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख आणि खुद्द शरद पवार यांनीही त्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मतभेद असल्याचं बोललं जाऊ लागलं. भीमा-कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणाबाबतीतही या बैठकीत चर्चा झाली.


'शरद पवार यांनी एसआयटीची मागणी केली होती. त्यानुसार एसआयटी मार्फत चौकशी होईल. गृहमंत्री लवकरच एसआयटीची स्थापना करतील. राज्य सरकार अशी चौकशी करु शकते, अशी तरतूद एनआयएच्या कायद्यामध्ये आहे,' असं नवाब मलिक म्हणाले आहेत.


'एसआयटीकडून चौकशी करण्याची मागणी झाली आहे. याबाबत कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घेऊ. तसंच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन याबाबत निर्णय घेऊ', असं वक्तव्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या बैठकीनंतर केलं.