शिवसेनेने प्लान बदलला? पक्षातच वाढला नरमाईचा सूर
शिवसेनेचा सूर नरमला
मुंबई : विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राज्यात भाजप आणि शिवसेनेमध्ये सत्तासंघर्ष सुरु झाला आहे. सुरुवातीला आक्रमक असलेल्या शिवसेनेचा सूर नरमलाय का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. 'तुझं ते माझं, आणि तुझ्या बापाचंही तेही माझं, जास्त ताणू नका, तुटेल' असं म्हणणारे संजय राऊत हे आता एकत्र येण्यातच दोघांचं हित आहे, असं वक्तव्य करत आहेत.
सध्या भाजपा-शिवसेनेतलं बार्गेनिंग फिफ्टी फिफ्टीच्या मुद्द्यावर अडलंय. पण सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेनं नमतं घ्यावं असा सूर शिवसेनेतच वाढू लागलाय. सध्या शिवसेना खासदार संजय राऊत, आमदार अनिल परब आणि ज्येष्ठ नेते दिवाकर रावते फिफ्टी फिफ्टीच्या फॉर्म्युलावर ठाम आहेत. तर शिवसेनेनं नरमाईची भूमिका घ्यावी असा खासदार अनिल देसाई, ज्येष्ठ नेते सुभाष देसाई आणि विनायक राऊतांचा आग्रह आहे. तर जे योग्य ते करावं, असं माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, आनंदराव अडसूळ आणि केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांचं म्हणणं आहे.
निकाल लागून आठवडा होत आला तरी भाजपा आणि शिवसेनेकडून एकमेकांना कुठलाही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही... त्यातच शिवसेनेकडून रोज आक्रमक वक्तव्यं केली जातायत. पण त्याचवेळी शिवसेना सत्ता निसटणार नाही, याचीही खबरदारी घेते आहे.
सत्तासंघर्षाच्या घडामोडी लक्षात घेता आदित्य ठाकरे यांचा कोकण दौरा रद्द करण्यात आलाय. येत्या काही दिवसांत अमित शाह आणि उद्धव ठाकरेंचा संवाद होऊ शकतो. सुभाष देसाई आणि दिवाकर रावतेंना भाजपाच्या नेत्यांशी बोलणी करण्याची जबाबदारी दिली जाऊ शकते. बार्गेंनिंगसाठी एखाद्या आमदाराला फोन आलाच, तर तो रेकॉर्ड करण्याचे आदेश देण्यात आलेत.
सरकारस्थापनेबद्दल उद्धवच काय तो निर्णय घेतील, असंच सांगा, असे आदेश प्रवक्त्यांना, नेत्यांना देण्यात आलेत, अर्थात संजय राऊत याला अपवाद आहेत. जोगेश्वरीचा मातोश्री क्लब आमदारांसाठी गरज लागल्यास सज्ज करण्याचे आदेश दिलेत. गेल्यावेळीही एका रात्रीत शिवसेना विरोधी बाकं सोडून सरकारमध्ये सहभागी झाली होती. सत्तेचा मोह सोडता येत नाही, हेही खरंच.