मुंबई : मुलीच्या नावे फेक फेसबुक अकाऊण्ट उघडून सेक्सटॉर्शन (Sextortion) करत तरुणांची फसवणूक करण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यात प्रचंड वाढले आहेत. तरुण, व्यापारी, उद्योजक यासह विविध क्षेत्रातील व्यक्तींना गोड बोलून जाळ्यात ओढायचं आणि त्यानंतर त्यांना धमकी देत पैसे उकळायचे असे प्रकार सर्रास सुरु आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता या सेक्सटॉर्शनच्या जाळात शिवसेनेचाच एक आमदार अडकण्याचा प्रयत्न झाल्याचं समोर आलं आहे. सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवण्याचा डाव पोलिसांनी वेळीच उद्ध्वस्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी राजस्थानातील भरतपूरमधून आरोपीला अटक केली असून मौसमदीन मेव असं या आरोपीचं नाव आहे. 


काय आहे प्रकरण?
तक्रारदार शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर हे मुंबईतून सलग दोन वेळा विधानसभा आमदार आहेत. त्यांना 20 ऑक्टोबरच्या रात्री मोबाईलवर मदतीसाठी संदेश आला होता. हा संदेश महिलेच्या नावाने पाठवण्यात आला होता. मंगेश कुडाळकर यांनी मदतीच्या उद्देशाने प्रतिसाद संभाषण केलं. चॅटद्वारे या व्यक्तीने आमदाराकडे मदत मागितली. त्यानुसार आमदाराने मदत करण्याचे आश्वासन दिले. काही वेळाने आमदाराला एका महिलेचा व्हिडीओ कॉल केला. महिलेने सुमारे 15 सेकंद आमदारांशी बोलून मदतीबाबत चर्चा केली.


फोन कट होताच आमदाराच्या मोबाईलवर एक व्हिडीओ पाठवण्यात आला. आरोपींनी आमदाराचा आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करत त्यांना अश्लील व्हिडिओ क्लिप दाखवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. आमदाराने तात्काळ मुंबईत पोलिसांत तक्रार दिली.


सेक्सटॉर्शन म्हणजे काय?
लैंगिकतेचा आधार घेऊन किंवा लैंगिक छळ केल्याचा बनाव करून उकळली जाणारी खंडणी म्हणजे 'सेक्सटॉर्शन'. एखाद्या व्यक्तीचा फोटो अथवा व्हिडीओमध्ये छेडछाड करून त्याचा नग्न फोटो किंवा व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळण्याचे प्रकार वाढले आहेत.


हे अवश्य ध्यानात ठेवा
समाज माध्यमांवर अनोळखी व्यक्तीसोबत जपून मैत्री करा. अनोळखी व्यक्तीचे 'व्हिडीओ कॉल' स्वीकारू नका. अनेकदा तरुणांना फसवण्यासाठी आकर्षक तरुणींच्या चेहऱ्याचा वापर होतो. एखादा 'न्यूड कॉल' चुकून स्वीकारला तर अधिक काळ बोलू नका. लैंगिक छळाचा आरोप, बदनामीची भीती दाखवून पैशाची मागणी होते. खंडणी मागितल्यास आर्थिक व्यवहार करू नका, वेळीच तक्रार करा.


राजस्थानमधून आरोपीला अटक
शिवसेना आमदाराला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवणाऱ्याला राजस्थानमध्ये अटक करण्यात आली आहे. मौसमदीन मेव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. राजस्तानमधल्या भरतपूर इथल्या सिकारी पोलिस ठाण्याच्या पथकाने आरोपीला त्याच्या गावातून पकडले. लवकरत या आरोपीचा ताबा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला दिला जाणार आहे.