उसळलेल्या समुद्रात फोटोशुट करणं पडलं महागात, मुलाच्या मोबाईलमध्ये कैद झाला आईच्या मृत्यूचा व्हिडिओ
मुंबईतल्या बँड स्टँड इथं एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समुद्र किनारी फिरायला आलेली एक महिला पती आणि तीन मुलांच्या डोळ्यादेखत समुद्रात वाहून गेली. दुर्देवी गोष्ट म्हणजे महिलेच्या मृत्यूचा थरार तिच्या मुलाच्यात मोबाईलमध्ये कैद झाला आहे.
Crime News : पावसाळ्यात किंवा भरतीच्या वेळी समुद्रात (Sea) जाऊ असं आव्हान वारंवार केलं जातं. अनेकवेळा याकडे दुर्लक्ष केलं जातं. पण हे नसतं धाडस जीवावरही बेतू शकतं. असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर (Viral Video) व्हायरल झाला आहे. समुद्राला उधाण आलं असताना एक जोडप समुद्रातील खडकावर बसून फोटोशूट (Photo Shoot) करत होतं. तर त्यांचा मुलगा मोबाईलमध्ये त्यांचा व्हिडिओ बनवत होता. पण तो क्षण त्यांच्या आयुष्यातला शेवटचा ठरला. मुलाच्या मोबाईलमध्ये त्याच्या आईचा मृत्यूचा थरार कैद झाला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नसतं धाडस जीवाशी
ही घटना प्रत्येकासाठी इशारा आहे. समुद्राला उधाण आलं असताना समुद्रापासून दूर राहिला पाहिजे. थोडीसी मस्करी जीवावार बेतू शकते. नेमकं याकडेच या जोडप्याने दुर्लक्ष केलं आणि एका चुकीमुळे महिलेने जीव गमावला. समुद्राच्या लाटेबरोबर ही महिला समुद्रात वाहून गेली. पती आणि मुलांच्या डोळ्यादेखत त्या महिलेचा जीव गेला. ही घटना मुंबईतल्या बँड स्टॅंड इथली आहे. व्हायरल होणारा हा व्हिडिओ आपल्या प्रत्येकासाठी सावध करणारा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 9 जुलैला एक कुटुंब समुद्रकिनारी फिरण्यासाठी आलं होतं. मुकेश सोनार, पत्नी ज्योती सोनार आणि त्यांची तीन मुलं रविवार असल्याने बँड स्टॅंड जवळ मौजमजेसाठी आले होते. यावेळी समुद्राच्या पार्श्वभूमीवर फोटो काढण्याचा मोह मुकेश आणि ज्योती सोनारला झाला. मुकेश आणि ज्योती समुद्रातील खडकांवर बसून फोटोशूट करत होते. तर त्यांचा मोठा मुलगा मोबाईलमध्ये आपल्या आई-बाबांचे फोटो आणि व्हिडिओ बनवत होता. काहीवेळ असाच मजेत गेला. पण अचानक समुद्राची एक मोठी लाट आली आणि त्या लाटेत पती आणि पत्नीचा हात सुटला. पत्नी लाटेबरोबर समुद्रात वाहून गेली. पती आणि मुलं तीला वाचवण्यासाठी जोरजोरात ओरडू लागली. पण उसळत्या समुद्रात तिला वाचवणं त्यांना शक्य झालं नाही आणि त्यांच्या डोळ्यादेखत महिला समुद्रात वाहून गेली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ट्वीटरवर Pramod Jain या अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
नवी मुंबईतल्या गौतम नगर इथं मुकेश आणि ज्योती सोनार आपल्या तीन मुलांसह राहातात. मुकेश एका खासगी कंपनीत टेक्निशियन आहेत. पती मुकेश यांनी दिलेल्या माहितीनुसार समुद्रात मोठी लाट आल्यानंतर ज्योतीचा तोल गेला, आपण तिची साडी पकडत तिला सांभाळण्याच प्रयत्न केला. त्याचवेळी तिथं असलेल्या एका माणसाने ज्योतीचा पाय पकडला. पण पाण्याचा वेग जास्त असल्याने त्याच्या हातातून तिचा पाय निसटला आणि ज्योती समुद्राच्या पाण्यात वाहून गेली. मुलाच्या मोबाईलमध्ये आयुष्यातले आनंदच क्षण टिपले जात असतानाच दुर्देवाने आईच्या मृत्यूचा लाईव्ह व्हिडिओही कैद झाला. आपली आई आपल्यापासून डोळ्यादेखत कायमची निघून जाईल अशी जराशीही शंका त्या मुलांच्या मनात आली नसेल.
इशाऱ्याकडे लोकांकडून दुर्लक्ष
मुंबईतील जुहू आणि वर्सोवा समुद्रात मोठी भरती येणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला होता. पण रविवार असल्याने समुद्रकिनाऱ्यावर लोकांची बरीच गर्दी होती. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्तही ठेवला होता. पण काही हौशी लोकं पोलिसांची नजर चुकवत समुद्रात जाण्याचं धाडस करतात अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.