मुंबई : शॉपिंगसाठी नवा फंडा घेऊन महाराष्ट्र राज्य सरकार घेऊन येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र राज्य सरकारचे पर्यटन मंत्रालय आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत पहिल्यांदाच ‘मुंबई शॉपिंग फेस्टीव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रकारचा भारतातील हे पहिलेच फेस्टीव्हल असून ते १२ ते ३१ जानेवारीदरम्यान मुंबईच्या तीन भागात आयोजित करण्यात आले आहे.


तीन ठिकाणी असणार हे मुंबई शॉपिंग फेस्टीव्हल 


या फेस्टीव्हलचे उद्घाटन १२ जानेवारी रोजी जिओ गार्डन्स, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. हा ‘नाईट बाजार’ शनिवार आणि रविवारी पहाटे ४ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे मुंबईकर नागरिकांना आपल्या सोयीनुसार रात्रीच्या वेळीही घराबाहेर पडून मुंबई शॉपिंग फेस्टीव्हलचा आनंद घेता येणार आहे. 


 मालाडच्या माईंडस्पेस या ठिकाणी १९ आणि २० जानेवारी रोजी तर पवईमध्ये हायको याठिकाणी २६ आणि २७ जानेवारी रोजी या फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवायही इतर १३ ठिकाणी फेस्टीव्हलशी निगडीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


 महाराष्ट्र राज्यातील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी हा फेस्टीव्हल आयोजित करत असल्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत राज्यातील, देशातील आणि परदेशातील नागरिकांनी यावे यासाठी याचे आयोजन करण्यात आले असून आता दरवर्षी डिसेंबरमध्ये हा फेस्टीव्हल होणार असल्याचेही ते म्हणाले.