मुंबई : मुंबईची लाईफलाईन असलेली उपनगरीय लोकल रेल्वे सेवा, बेस्ट बस आणि मेट्रोसेवा बंद झाल्यानं रोज गजबजणारी ठिकाणं आज सुनीसुनी वाटत आहेत. रिक्षा आणि टॅक्सी सेवा मात्र सुरु असल्यानं रस्त्यावर वाहनांची वर्दळ काही प्रमाणात दिसत आहे. मुलुंड चेकनाक्यावर तर खाजगी वाहनं मोठ्या प्रमाणात दिसल्यानं जमावबंदी लागू केली तरी त्याचा अपेक्षित परिणाम अद्याप झाला नसल्याचं चित्र सोमवारी सकाळी दिसत होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी सकाळी दिसलेल्या परिस्थितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही गंभीर दखल घेतली. कोरोनाविरुद्धचा लढा गंभीरपणे घ्या. स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या आरोग्याशी खेळू नका. १४४ कलम लावले आहे त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील. रस्त्यावर वाहने आणून गर्दी करून कायदा मोडू नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.


रेल्वे आणि सार्वजनिक बस वाहतूक बंद केल्याचा परिणाम मुंबईत जाणवत असला तरी खाजगी वाहतूक सुरु असल्यामुळे मुंबईत अजूनही रस्त्यावर वर्दळ आहे. जीवनाश्यक वस्तुंच्या खरेदीसाठीही लोक घराबाहेर पडले आहेत. बँकांमधले व्यवहार करण्यासाठीही लोक बाहेर पडलेत. त्यामुळे रविवारी जनता कर्फ्युदरम्यान दिवसभऱ दिसलेलं मोकळ्या रस्त्यांचं चित्र आज मात्र बदललं आहे.


सार्वजनिक वाहतूक बंद असली तरी खाजगी गाड्याही लोकांनी बाहेर काढल्या आहेत. मुलुंड चेकनाक्यावर सकाळी खाजगी वाहनांची गर्दी पाहता सरकारला आणखी कठोर उपाययोजना करण्याबाबत विचार करावा लागणार आहे. लांबपल्ल्याच्या रेल्वे आणि एसटी बस वाहतूक बंद झाल्यानं लोकांनी कोरोनाने जगभरात गंभीर परिस्थिती झाली असताना मुंबईसारख्या शहरात लोकांमध्ये आणखी जनजागृती करण्याची किंवा आणखी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे.


जमावबंदीचा अपेक्षित परिणाम दिसत नसला तरी काही ठिकाणी पोलीस चारपेक्षा अधिक लोक एकत्र आल्यास त्यांना हटकताना दिसत आहेत. खाजगी वाहनं सुरु असल्यानं वाहनांची गर्दी होत असल्यानं मुख्यमंत्र्यांनीही कोरोनाविरुद्धचा लढा गंभीरपणे घेण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. परिस्थिती अशीच राहिली तर सरकारला आणखी कठोर उपाययोजना करण्याचा विचार करावा लागणार आहे.