Mumbai News : मुंबईसह देशभरातील नागरिकांसाठी श्रद्धास्थानी असणाऱ्या श्री सिद्धिविनायक गणपतीच्या दर्शनासाठी दर दिवशी भाविकांची मोठी रांग पाहायला मिळते. आठवड्याच्या अखेरीस आणि त्यातही सुट्ट्यांच्या दिवशी तर इथं गर्दीचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढलेलं असत. पण, याच सिद्धिविनायक मंदिरामध्ये देवाच्या दर्शनाच्या नावाखाली भाविकांची फसवणूक केली जात असल्याची खळबळजनक बाब नुकतीच उघडकीस आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात पैसे आकारत सिद्धिविनायकाचं VVIP दर्शन देणाऱ्यांच्या रॅकेटचं बिंग फुटलं आणि अनेकांना धक्काच बसला. सदर प्रकरणी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून आता या रॅकेटमध्ये किती जणांचा सहभाग आहे याचा पोलीस शोध घेत आहेत. 


प्रभादेवी येथे असणाऱ्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक येत असतात. यामध्येसुद्धा मंदिरात मुखदर्शन, गाभाऱ्यातील दर्शन रांग तिथं गेलं असता नजरे पडते. याच मंदिरात व्हीव्हीआयपी दर्शन रांग, गणपतीच्या पूजेच्या नावानं एक बनावट वेबसाईट तयार करण्यात आली असून, त्या माध्यमातून नागरिकांची लूट करण्यात आली. या वेबसाईटच्या माध्यमातून दर्शनाच्या नावाखाली काही कर्मचारी आणि दलालांकडून हजार ते तीन हजार रुपये घेत व्हीव्हीआयपी रांगेतून दर्शन करुन दिलं जात होतं. ऑक्टोबर महिन्यात पहिल्यांदा ही बाब समोर आली आणि त्यानंतर मंदिर समितीकडून अंतर्गत चौकशी सुरु करण्यात आली. 


चौकशीदरम्यानच बुधवारी याप्रकरणी दादर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. एका अज्ञात इसमाविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या पुढील तपास सुरु असल्याची माहिती यंत्रणांनी दिली आहे.