मेघा कुचिक, झी २४ तास, मुंबई : घडाळ्याच्या काट्यावर धावणारं, कायम गजबजलेलं, उत्साही, उत्सवी म्हणून मुंबई शहराची ओळख आहे. काहीही झालं तरी मुंबई सतत धावत असते. मुंबईकर आपापल्या कामात व्यस्त असतो. पण याच मुंबईचा वेग कोरोनामुळं मंदावलाय. मुंबईतले मॉल्स, थियटर्स बंद आहेत, कोरोनाच्या धास्तीनं सुट्टीच्या दिवशी घराबाहेर पडणारा मुंबईकरानं घरातच बसणं पसंत केलंय. खाऊ गल्ल्याही ओस पडल्यात. सुट्टीच्या दिवशी मुंबईकर हॉटेलिंगलाही घराबाहेर पडलेला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईची लाईफ लाईन असलेली बेस्ट देखील या कोरोनाशी लढण्यासाठी सज्ज झालीय. ज्याप्रमाणे रेल्वेत निर्जंतुकीकरण केलं जातंय. तसंच मुंबईच्या बेस्टनं देखील विविध रसायनं वापरत बस निर्जंतुक केली जातेय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेत वाढ करण्यात आलीय.


दादर पश्चिमेतला नेहमी ग्राहकांची गर्दी असलेला स्टार मॉल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलाय. मॉलच्या परिसरात एक दोन दुकानं उघडी आहेत. रविवार सुटीचा दिवस असतानाही या परिसरात अजिबात गर्दी नव्हती. दादरसारख्या गर्दीच्या भागातही लोकांची गर्दी नव्हती.



लोअर परळ भागातला फिनिक्स मॉल बंद ठेवण्यात आलाय. या मॉलमधील थिअटर्सही बंद करण्यात आलाय. सरकारच्या आदेशानुसार मॉल बंद असल्यानं एरव्ही मोठी वर्दळ असलेल्या या भागात शुकशुकाट आहे.


मुंबईनं अनेक संकटांचा सामना केला. कोरोनालाही हरवू असा विश्वास मुंबईकरांना आहे. रिकामे रस्ते, ओस मॉल पाहण्याची मुंबईकरांना सवय नाही. कोरोनाचं संकट टळल्यावर मुंबई पुन्हा त्यात जोशात पुन्हा गजबजून जाईल यात शंका नाही.