मुंबईतल्या कॉलेजमध्ये हिजाब बंदीच्या निर्णयावर स्थगिती, सुप्रीम कोर्टाने मागितलं उत्तर
Mumbai : मुंबईतल्या दोन कॉलेजमध्ये विद्यार्थिनींना हिजाब घालून कॉलेजमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यानंतर कॉलेजने हिजाब, नकाब, बुरखावर बंदी घालणारं परिपत्रकचं काढलं. याविरोधात नऊ विद्यार्थिनींनी सुप्रिम कोर्टात धाव घेतली होती.
Mumbai : मुंबईच्या एका खासगी कॉलेजमध्ये हिजाब बंदीच्या निर्णयावर सुप्रिम कोर्टात सुनावणी झाली. सुप्रिम कोर्टाने (Supreme Court) हिजाब (Hijab), निकाब, बुरखा, स्टोल, टोपी घालणाऱ्या बंदी निर्णयावर स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर सुप्रि कोर्टाने कॉलेज प्रशासनाला नोटीस बजावून उत्तरही मागवलं आहे. मुंबईतल्या एनजी आचार्य (Acharya College) आणि डीके मराठे कॉलेजने हिजाब, निकाब, बुरखा, स्टोल, टोपी घालण्यावर बंदी घातली आहे. याविरोधात नऊ मुलींनी मुंबई हाय कोर्टात धाव घेतली. मात्र मुंबई हायकोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर या मुलीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना कोणी कपाळावर टिळा लावला म्हणून कॉलेजमध्ये प्रवेश नाकारता येतो का? असा सवाल सुप्रीम कोर्टाने विचारलाय.
काय आहे नेमकं प्रकरण?
मुंबईत चेंबूरच्या एनजी आचार्य कॉलेजमध्ये हिजाब घालणाऱ्या विद्यार्थिनींना प्रवेश नाकारण्यात आला होता. एन जी आचार्य कॉलेजमध्ये अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ड्रेस कोड लागू करण्यात आलाय. त्यानंतर हिजाब घालून आलेल्या विद्यार्थिनींना गेटवरच अडविण्यात आलं. कॉलेजनं ठरवून दिलेला युनिफॉर्मच घालावा, अशी माहिती विद्यार्थी आणि पालकांना 1 मे लाच देण्यात आली होती, असं कॉलेज प्रशासनाचं म्हणणं आहे. त्यामुळे हिजाब घालणाऱ्या विद्यार्थिनींना अडवण्यात आल्याचं कॉलेजचं म्हणणं आहे. तर कॉलेजमध्ये हिजाब आणि ओढणीला परवानगी द्यावी अशी मागणी मुस्लीम विद्यार्थी आणि पालकांनी केलीय.
कॉलेज बाहेर विद्यार्थी आणि पालकांचा गोंधळ
एन जी आचार्य कॉलेजमध्ये अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ड्रेस कोड (Dress Code) लागू केल्यानंतर हिजाब घालून आलेल्या विद्यार्थिनींना गेटवरच अडविण्यात आलं. त्यामुळे कॉलेज बाहेर विद्यार्थी आणि पालकांनी एकत्र येत कॉलेज प्रशासनाच्या या भूमिकेचा विरोध करत हिजाब घालून विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश दिला जावा अशी मागणी करत गोंधळ घातला. तर 1 ऑगस्ट पासून युनिफॉर्म घालूनच विद्यार्थी कॉलेजमध्ये प्रवेश करतील अशा सूचना कॉलेजतर्फे देण्यात आल्या होत्या अशी भूमिका कॉलेज प्रशासनाकडून मांडण्यात आली.
स्त्यावर विद्यार्थिनी हिजाब काढून कॉलेजमध्ये प्रवेश करणार नाहीत. यासोबतच विद्यार्थिनींना दुपट्टा घालण्याची परवानगी दिली जावी अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली. हिजाब घातलेल्या मुलींना कॉलेजमध्ये प्रवेश नाकारल्यानंतर काही काळ कॉलेज बाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले होतं. त्यामुळे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.