मराठा मोर्चा : मुंबईला छावणीचे स्वरुप, आज मुंबई थांबणार
कोपर्डीतील पीडितेला न्याय मिळावा, मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावा अशा प्रमुख मागण्यांसाठी मराठ्यांचे वादळ काही वेळातच राजधानी मुंबईत धडकणार आहे. मोर्चासाठी राज्याचा कानाकोपऱ्यातून मराठा बांधव लाखोंच्या संख्येने मुंबईत दाखल होत आहेत. रात्रीपासूनच मुंबईत मराठा बांधव दाखल होण्यास सुरुवात झाली होती. मोर्चाचा परिणाम सुरू झाला असून, अनेक मार्गावरील वाहतूक संथ झाली आहे.
मुंबई : कोपर्डीतील पीडितेला न्याय मिळावा, मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावा अशा प्रमुख मागण्यांसाठी मराठ्यांचे वादळ काही वेळातच राजधानी मुंबईत धडकणार आहे. मोर्चासाठी राज्याचा कानाकोपऱ्यातून मराठा बांधव लाखोंच्या संख्येने मुंबईत दाखल होत आहेत. रात्रीपासूनच मुंबईत मराठा बांधव दाखल होण्यास सुरुवात झाली होती. मोर्चाचा परिणाम सुरू झाला असून, अनेक मार्गावरील वाहतूक संथ झाली आहे.
सतत धावणारी मुंबई आज मराठा मोर्चाच्या निमित्ताने काही काळ थांबणार आहे. मोर्चामध्ये माथाडी कामगार, मुंबईचे डबेवाले मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. पुणे-मुंबई एक्सप्रेस-वे वर जड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. या वेवर ड्रोनद्वारे पोलीस लक्ष ठेऊन आहेत. महामार्गावरून मोठ्या संख्येने वाहने मुंबईत दाखल होत आहेत. दक्षिण मुंबईतील सुमारे 500 शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी देण्यात आली आहे. शंभरहून अधिक सामाजिक संघटना मराठा बांधवाच्या सेवेसाठी पहाटे पासूनच मुंबईच्या रस्त्यावर राबत आहेत.
पंधरा हजार स्वयंसेवकांची फौज
मोर्चासाठी राज्य सरकारने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. राज्य राखीव दलाच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबईच्या विविध भागात पोलीस बंदोबस्त राहणार असून दक्षिण मुंबईला तर पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे. मराठा मोर्चाच्या आयोजकांनीही सुरक्षेसाठी 15 हजार स्वयंसेवकांची फौज तयार केली असून त्यांचे प्रशिक्षणही घेतले आहे.
भायखळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने, चेंबूर सर्कलपासूनच सर्व वाहनांना वळण दिले आहे. मोर्चात सामील होण्यासाठी येणारी वाहने चेंबूर सर्कलपासून वळण घेऊन बीपीटी सिमेंट यार्डच्या दिशेने रवाना होतील. तिथून अवघ्या एक किलोमीटरवर कॉटनग्रीन किंवा रे रोड मार्गे मोर्चाच्या ठिकाणी जाता येणार आहे.
दादर ते जे.जे. अन्य वाहनांना बंदी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील दादर फायर ब्रिगेड जंक्शन ते जे.जे. उड्डाणपूल ज्या ठिकाणी सुरू होतो, त्या ठिकाणापर्यंत दक्षिण वाहिनी सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहतील. जे.जे. उड्डाणपुलावरून सीएसटीएम जंक्शनपर्यंत दक्षिण व उत्तर मार्ग वाहतुकीसाठी बंद असतील.