मध्य रेल्वे मार्गावरच्या लोकलमध्ये धूर, प्रवाशांचा आरडाओरडा, पण नंतर कळलं...
Mumbai Railway : मध्य रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या लोकलमध्ये अचानक धुर पसरल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. सीएसएमटी स्थानकातून ठाणेकडे जाणाऱ्या रेल्वेमध्ये ही घटना घडली. पण ही केवळ गैरसमजातून अफवा पसरल्याचं नंतर स्पष्ट झालं
Mumbai Railway : मध्य रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना ऐन घरी परतण्याच्यावेळी पुन्हा एकदा त्रासाला सामोरं जावं लागलं. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून 4:30 वाजातच्या लोकलमध्ये (Railway Local) अचानक धूर (Smoke) आल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. भायखळा स्टेशनवर लोकल थांबलेली असतांना अचानक लोकल ट्रेनमध्ये धूर पसरला. त्यामुळे प्रवाश्यांमध्ये आरडाओरडा सुरू झाला आणि भीतीचे वातावरण निर्माण झालं. लोकलमध्ये असलेल्या प्रवाशी भायखळा स्टेशन वर उतरले. प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. यामुळे भायखळा प्लॅटफॉर्म प्रवाशांची एकच गर्दी झाली. ही लोकल सीएसएमटीवरुन ठाण्याला जात होती.
रेल्वे पोलिसांनी तात्काळ प्रवाशांना लोकलमधून खाली उतरवलं आणि चौकशी केली. शेजारच्या रुळावरून एक इंजिन गेलं त्याचा धूर सीएसएमटी ते ठाणे लोकल ट्रेन जी भायखळा स्टेशनवर उभी होती त्यामध्ये पसरला. त्यामुळे अचानक प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. पण नंतर खरं कारण कळल्यावर प्रवासी पुन्हा रेल्वेत चढले आणि रेल्वे मार्गस्थ झाली. मध्य रेल्वे मार्गावर वाहतूक सुरळीत आहे. प्रवाशांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असं आवाहान मध्ये रेल्वे व्यवस्थापनाने केलंय.