मुंबई : विरोधी पक्षांना भारतीय जनता पक्षाविरोधात एकत्र येण्याचं आवाहन केल्यानंतर आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (k Chandrashekar Rao) आज मुंबईत दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांची भेट घेतली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर केसीआर (KCR) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केसीआर यांच्या स्वागतासाठी मुंबईत ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. तेलंगण राष्ट्र समिती (TRS) दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जेवणासाठी आमंत्रित केलं होतं.



केसीआर यांचा भाजपावर निशाणा
केसीआर यांनी भाजपवर निशाणा साधत भाजपला देशातून हद्दपार करा अन्यथा देश उद्ध्वस्त होईल, असं वक्तव्य केलं आहे. भाजपला सत्तेतून हटवण्यासाठी राजकीय शक्तींनी एकत्र येण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. भाजपच्या विरोधात विविध विरोधी पक्षांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून केसीआर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांना भेटण्याची योजना आखत आहेत.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर केसीआर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन राष्ट्रीय राजकारणाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करतील. त्यानंतर संध्याकाळी राव हैदराबादला परततील. ठाकरे यांनी भाजपच्या कथित जनविरोधी धोरणांविरुद्ध राव यांच्या लढ्याला "संपूर्ण पाठिंबा" देऊ केला आहे.



राव यांच्या प्रयत्नांचे कौतुक करताना ठाकरे म्हणाले की, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी देशाला फुटीरतावादी शक्तींपासून वाचवण्यासाठी योग्य वेळी आवाज उठवला होता. माजी पंतप्रधान आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) अध्यक्ष एचडी देवेगौडा यांनी अलीकडेच राव यांना फोन करून त्यांच्या लढ्याला पाठिंबा दिला होता. राव यांनी देवेगौडा यांना आपण बंगळुरूला येऊन या विषयावर बोलू, असं सांगितलं होतं.