देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई :  दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई शहरांना जोडून मुंबई मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. जगातील सर्वात 22 किमी लांबीच्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाची पाहणी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, भा. प्र.से. यांनी केली.  (mumbai trans harbour link project construction latest news)


विद्युत दिव्याचा खांबांच्या उभारणीला सुरुवात!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकल्पाचे आतापर्यंत 96.60 टक्के कामं पूर्ण झाले असून विद्युत खांबाच्या उभारणीचं काम हाती घेण्यात आलं आहे. या 22 किमी लांबीच्या लिंकवर 1212 विद्युत दिव्यांच्या खांबांची उभारणी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत 20 टक्के खांबांची उभारणी झाली आहे. या खांबांवरील विद्युत दिवे हे केंद्रीय नियंत्रण आणि देखरेख प्रणालीव्दारे (Central Control & Monitoring System ) नियंत्रित असणार आहे. सागरी क्षेत्रातील हवामानाच्यादृष्टीने निर्माण होणाऱ्या आव्हानावर मात करण्याचं सामार्थ या खांबांमध्ये आहे. विशेषतः खारट वातावरणात त्यांची उपयुक्तता, गंज-मुक्त पॉलीयुरेथेन लेप, गंज टाळण्यासाठी आणि आयुष्य वाढवण्यासाठी गॅल्वनायझेशन, जोरदार वाऱ्याच्या वेगाशी सामना करण्यासारख्या आव्हानांना तोंड देणारी संरचनात्मक रचना आणि संपूर्ण पुलावर एकसमान प्रदीपन या सगळ्याचा विचार करु त्यांची निर्मीती केली आहे. त्याशिवाय या खांबांना वीज अवरोधक यंत्रणा बसवण्याची सोयदेखील करण्यात आली आहे. 



 बांधकामासाठी नाविन्यपूर्ण दृष्टीकोन


एमटीएचल प्रकल्पाची व्याप्ती पाहता, हा प्रकल्प एकूण 4 पॅकेज मध्ये विभागला आहे. ज्यामध्ये 3 पॅकेज हे स्थापत्य कामांकरीता असून 4 था पॅकेज हा इंटेलिजेंट ट्रान्सपोर्ट सिस्टम (intelligent transport system), स्वयंचलित टोल कलेक्शन यंत्रणा आणि विद्युत कामांकरीता असल्याने तो इतर पॅकज प्रमाणेच विशेष महत्त्वाचा असणार आहे. एमटीएचल हा प्रकल्प सुमारे 90 ते 180 मीटर लांबीच्या ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक (OSD) सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या प्रकल्पाचं बांधकाम झालं आहे. 


प्रकल्पाचं वैशिष्ट्यं 


या प्रकल्पामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी बंदर, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गासह विविध महत्त्वाच्या ठिकाणी जलद जोडणी होणार आहे.  त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशाच्या सर्वांगीन विकासासाठी आणि समृद्धीसाठी हा प्रकल्प अतिशय महत्त्वपूर्ण आहे. 


या प्रकल्पाच्या पाहणीनंतर एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, भा.प्र.से. यांनी उल्लेखनीय प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. त्याशिवाय ते म्हणाले की, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प हा मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासातील एक महत्त्वाचा भाग असून हा केवळ कनेक्टिव्हिटी सुधारणार प्रकल्प नसून प्रदेशाच्या सर्वांगीण समृद्धीसाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात आणणाऱ्या प्रत्येकाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्याशिवाय एमएमआरडीए एमटीएचएल प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी आणि मुंबई, नवी मुंबईच्या वाहतूक नेटवर्कमध्ये त्याचं यशस्वी एकत्रीकरण सुनिश्चित करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध असल्याचंही ते यावेळी म्हणाले.