मुंबई : तपास यंत्रणा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम विरोधात आपला फास आवळत असतानाच, केंद्र सरकारच्या महसूल विभागानेही दाऊद विरोधात आपली मोहीम तीव्र केली आहे. दाऊदच्या दक्षिण मुंबई आणि इतरत्र असलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्यास केंद्रीय महसूल विभागाने सुरूवात केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव करण्यासाठी विविध वृत्तपत्रात जाहीरातही करण्यात आली आहे. भेंडी बाजारातील शबनम गेस्ट हाऊस, डामरवाला इमारतीतील काही घरं, पाकमोडिया स्ट्रीट आणि याकूब स्ट्रीटवरील जागा, हॉटेल रौनक अफरोज यासह माझगाव आणि औरंगाबादच्या काही प्रॉपर्टींचा यात समावेश आहे. यापैकी रौनक अफरोझ या प्रॉपर्टीची आधार किंमत १ कोटी १८ लाख ६३ हजार रूपये ठेवण्यात आली आहे. तर डामरवाला इमारतीतल्या १८,२०,२२,२५,२६ या फ्लॅटची आधार किंमत १ कोटी ५५ लाख रूपये ठरवण्यात आली आहे.


चर्चगेटला इंडियन मर्चंट्स चेंबरच्या कॉन्फरन्स रूममध्ये १४ नोव्हेंबरला दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव होणार आहे. एकाच वेळी या सर्व जागांचा लिलाव आणि ई ऑक्शनच्या माध्यमातून बंद लिफाफ्यात लावण्यात आलेली बोली जाहीर केली जाईल.


१९९३मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी दाऊद भारताला विशेष करून मुंबई पोलिसांना हवा आहे. मात्र, दाऊद गेली अनेक वर्षे फरार असून, तो पाकिस्तानात लपून बसल्याची तपास यंत्रणांची माहिती आहे. दरम्यान, दाऊदला पकडणे हा राजकीय मुद्दाही बनला आहे. अनकेदा त्याला फरफटत भारतात आणण्याची अश्वासने राजकीय नेते, गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि इतर यंत्रणांकडून केली जातात. प्रत्यक्षात मात्र त्याला अद्याप यश आले नाही. मात्र, मालमत्तेच्या लिलावामुळे त्याला मोठा धक्का बसणार आहे.