मुंबई विद्यापीठात कार्बन न्युट्रल ग्रीन कँपस, काय होणार फायदा? जाणून घ्या
Mumbai University: ग्रीन कॅम्पसमुळे उर्जेच्या वापरात 20 ते 30 टक्क्यांची बचत, पाण्याची सुमारे 30 ते 50 टक्के बचत, रहिवाशांचे आरोग्य आणि कल्याण, हवेची गुणवत्ता वाढीस मदत, जैवविविधतेला प्रोत्साहन आणि दुर्मिळ राष्ट्रीय संसाधनाचे संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून विद्यापीठाने ही योजना हाती घेतली आहे.
Mumbai University: वाढते प्रदूषण, पाण्याचे आटत चाललेले स्त्रोत अशा विविध कारणांमुळे मानवासमोर आव्हान उभे राहिले आहे. यावर मुंबई विद्यापीठाने एक पाऊल उचलले आहे. विद्यापीठाकडून कार्बन न्युट्रल ग्रीन कँपससाठी पुढाकार घेतला असून विद्यानगरी संकुलात ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. नुकतेच यासाठी विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय आणि जिल्हा समन्वयक अधिकाऱ्यांसाठी आभासी पद्धतीने प्रशिक्षण पार पडले.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून कार्बन न्युट्रल ग्रीन कँपससाठी पुढाकार घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्याअंतर्गत विद्यानगरी संकुलासाठी योजना तयार करण्यात येत असून जैवविविधतेचे ऑडिट करण्यात आले आहे.
ग्रीन कॅम्पसमुळे उर्जेच्या वापरात 20 ते 30 टक्क्यांची बचत, पाण्याची सुमारे 30 ते 50 टक्के बचत, रहिवाशांचे आरोग्य आणि कल्याण, हवेची गुणवत्ता वाढीस मदत, जैवविविधतेला प्रोत्साहन आणि दुर्मिळ राष्ट्रीय संसाधनाचे संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून विद्यापीठाने ही योजना हाती घेतली आहे. ही योजना प्रभावीपणे कशी राबवली जाऊ शकते यासाठी क्लायमेट रियलिटी प्रोजेक्ट इंडिया अँड साउथ एशियाच्या रेखा लल्ला यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. सादरीकरणात पर्यावरणास अनुकूल पद्धतीचा अवलंब करताना महाविद्यालये आणि विद्यापीठानी हरीत धोरणाची आखणी करून त्या दिशेने वाटचाल करावी असे सांगितले.
त्याचबरोबर प्लास्टीकचा पुनर्वापर कार्यक्रम, कंपोस्टिंग प्रकल्प, कार्यक्षम प्रकाशयोजना, बाईक आणि सार्वजनिक वाहतुकीचे समर्थन, बाग-हर्बल, कागदाचा कमी वापर आणि उपकरणांचा वापर अशा अनुषंगिक बाबींवर सादरीकरण केले. ही कृती योजना अंमलात आणन्यासाठी विद्यापीठामार्फत लवकरच ग्रीन ऑडिट करण्यात येणार आहे. कार्बन न्यूट्रल ग्रीन कॅम्पसचा भाग म्हणून यापूर्वी विद्यानगरी संकुलात सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. गांडुळाच्या सहाय्याने सांडपाण्यावर प्रक्रिया करुन दर तासाला १२०० लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाणी शुद्धीकरण केले जाते.
मुंबई विद्यापीठाचे अधिसभा सदस्य तथा संचालक माय ग्रीन सोसायटीचे सुशील जाजू यांच्या पुढाकाराने हे प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणासाठी क्लायमेट रियालिटी प्रोजेक्ट इंडिया अँड साउथ एशियाचे अध्यक्ष आदित्य पुंडिर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विश्वंभर जाधव एनएसएस प्रोग्राम ऑफिसर तसेच अधिसभा सदस्य मुंबई विद्यापीठ यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सामान्य प्रशासन विभागाचे उपकुलसचिव अशोक घुले यांनी आभार मानले.