मुंबई विद्यापीठाचे प्रलंबित निकाल उठले विद्यार्थ्यांच्या जीवावर
मुंबई विद्यापीठाच्या प्रलंबित निकालांमुळे विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. एवढंच नव्हे तर हे प्रलंबित निकाल काही विद्यार्थ्यांच्या जीवावर बेततील की काय अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या प्रलंबित निकालांमुळे विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. एवढंच नव्हे तर हे प्रलंबित निकाल काही विद्यार्थ्यांच्या जीवावर बेततील की काय अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
दोन दिवसांत निकाल जाहीर केला नाही तर आत्महत्या करणार असल्याचं पत्र एका लॉच्या विद्यार्थ्यानं मुंबई विद्यापीठाला लिहिलंय. त्यामुळं मोठी खळबळ माजली आहे. पाच महिने उलटले तरी मुंबई विद्यापीठ सर्व विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात अपयशी ठरलंय.
1600 उत्तरपत्रिका अजूनही गहाळ असून विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. सरासरी मार्क देण्याचा निर्णय तर झाला पण सरासरी मार्क कशाच्या आधारवर द्यायचे याचा फॉर्म्युलाच विद्यापीठाकडून निश्चित होत नाहीय. त्यामुळं विद्यार्थ्यांना मोठ्या मानसिक त्रासाचा सामना करावा लागतोय.
यासर्वाची जबाबदारी कुणाची? या विद्यार्थ्यांना कुलपती काय उत्तर देणार? कुलपती विद्यार्थ्यांची भेट घेणार का? असे असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत.