Mumbai University Latest News: देशातील प्रतिष्ठित विद्यापीठंपैकी एक असणाऱ्या मुंबई विद्यापीठानं विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नव्या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या परीक्षांदरम्यान 60-40 ही गुणपद्धती लागू करण्याचा हा निर्णय आता लागू होणार असल्यामुळं येत्या काळात विद्यार्थ्यांना 60 गुणांची लेखी परीक्षा आणि अंतर्गत मुल्यमापनासाठी 40 गुण अशी विभागणी करण्यात येईल. 


पुन्हा एकदा 60-40 नुसार गुणांची विभागणी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2011- 2012 मध्ये मुंबई विद्यापीठानं पहिल्यांदाज 60-40 गुण विभागणीची पद्धत अवलंबात आणली होती. पण, यामध्ये 40 गुणांसाठी घेतल्या जाणाऱ्या अंतर्गत मूल्यमापन पद्धतीमध्ये गैरप्रकार होत असल्याची काही प्रकरणं उघडकीस आली आणि प्रशासनानं यामध्ये लक्ष घातलं. वरील गुणविभागणी सूत्रानुसार सदर वर्षी बी.कॉमचा निकाल 80 ते 85 टक्क्यांवर पोहोचला होता. 


निकालासंदर्भातील चौकशीनंतर समोर आलेल्या माहितीनुसार काही महाविद्यालयांमध्ये अंतर्गत मूल्यमापन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना अपेक्षेहून अधिक गुण सढळ हस्ते दिल्यामुळं ही वेळ ओढावली होती. पुढं अंतर्गत मूल्यमापनाचा सातत्यानं होणारा गैरवापर पाहता विद्यापीठानं 2016 - 17 मध्ये ही पद्धत मागे घेण्याचा निर्णय घेत 60-40 गुण विभागणी पूर्णपणे बंद केली होती. 


हेसुद्धा वाचा : Loksabha Election 2024 : महाराष्ट्रातील 'या' 14 गावांचे नागरिक दोन राज्यांसाठी करतात मतदान, काय आहे कारण? ​ 


 


दरम्यान, आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बीएससी, बीकॉम आणि बीए या अभ्यासक्रमांकरता 60-40 गुणविभागणी पद्धत पुन्हा लागू करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील माहिती विद्यापीठानं एका परिपत्रकाच्या माध्यमातून दिली. या गुणविभागणीचा फायदा शैक्षणिक वर्षात होणार असून अंतर्गत मूल्यमापनाचे गुण गृहित धरले जाणार असणार असल्यामुळं विद्यार्थ्यांची वर्गात अधिक उपस्थिती असेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


अंतर्गत मूल्यमापन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्षातील उपस्थिती, प्रात्यक्षिकं, प्रोजेक्ट, टेस्ट आणि असाईंन्मेंटचा समावेश असणार आहे. वर्षभर विद्यार्थ्यांचं या निकषांवर मूल्यमापन करण्यात येणार असून, त्या आधारे त्यांना 40 गुणांच्या आधारे गुण देण्यात येतील. ज्यामुळं आता विद्यार्थ्यांना वर्षभरात महाविद्यालयात हजर राहणं जवळपास बांधिल असेल. दरम्यान अद्यापही काही महाविद्यालयांना या आदेशासंदर्भात स्पष्टोक्ती नसल्यामुळं जून महिन्याच्या अखेरपर्यंत चित्र स्पष्ट होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.