Mumbai University Fake Marksheet Police Complaint : मुंबई विद्यापीठाची गुणपत्रिका 10 ते 12 हजारात घरी बसून मिळेल अशी जाहिरात काही दिवसांपूर्वी फेसबुकवर व्हायरल होत होती. ही जाहिरात पाहून पुण्यात राहणाऱ्या एका व्यक्तीने काही रक्कम दिली होती. यानंतर या व्यक्तीच्या व्हॉटसॲपवर एक बनावट गुणपत्रिका  मिळाली होती. मुंबई विद्यापीठाला या सर्व धक्कादायक प्रकाराची माहिती मिळाली. आता मुंबई विद्यापीठाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठ पोलीस स्थानकात याबद्दल सायबर तक्रार नोंदविणार आहे. 


नेमकं काय घडलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातील एका व्यक्तीने फेसबुकवर मुंबई विद्यापीठाची पदवी घरी बसून एका दिवसात 10 ते 12 हजारात मिळेल अशी जाहिरात पाहिली होती. त्या जाहिरातीद्वारे त्याने जाहिरातीतील फोनवर एका व्यक्तीशी संपर्क केला होता. त्याने 2000 रुपये अॅडव्हान्स मागितले. ही रक्कम भरल्यानंतर त्याला त्याच्या व्हॉटसॲपवर मुंबई विद्यापीठाची बीएससीची एक कथित बनावट गुणपत्रिका प्राप्त झाली. या सर्व प्रकाराची माहिती मुंबई विद्यापीठाला प्राप्त झाली होती. यानंतर आता या प्रकरणाची गंभीर दखल मुंबई विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. अजय भामरे यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी याबद्दल पोलिसात तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार पोलिसात तक्रार दाखल करण्यात येणार आहे.


गुणपत्रिका व पदवी बनवणाऱ्यांपासून सावध


तसेच मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी विद्यार्थ्यांनी अशा बनावट गुणपत्रिका व पदवी देणाऱ्यापासून सावध रहावे. विद्यार्थ्यांनी अशाप्रकारच्या कोणत्याही फसव्या जाहिरातीला बळी पडू नये, असे आवाहन केले आहे. 


मुंबई विद्यापीठ करणार कायदेशीर कारवाई 


दरम्यान सध्या बनवण्यात आलेली ही पदवी किंवा गुणपत्रिका बनावट आहे. फोटोशॉप किंवा इतर साधनाचा वापर करून बनावट गुणपत्रिका किंवा पदवी बनविली आहे. या सोबत ज्या व्यक्तींनी गुणपत्रिका घेतली आहे. ती देखील बनावट आहे. एप्रिल 2023 ची बीएससी सत्र 6 ची कथित गुणपत्रिका असून त्यावर स्वाक्षरी मात्र यापूर्वीच्या जुन्या परीक्षा संचालकांची आहे. यामुळेच अशा बनावट गुणपत्रिका आणि पदवी देणाऱ्यापासून सावध रहावे. तसेच पदवी देणाऱ्यांवर व पदवी घेणाऱ्यांवर मुंबई विद्यापीठ कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्टीकरण विद्यापीठाकडून देण्यात आले आहे.