Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षेस सकाळपासून सुरुवात झाली. तृतीय वर्ष बी.कॉम सत्र 5 ची परीक्षा सकाळी सुरू झाली. या परीक्षेपासून अचूकतेसाठी स्टिकर आणि ऑनलाईन उपस्थिती पद्धत सुरू करण्यात आली. आजच्या परीक्षेमध्ये 54 हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शविली. यामुळे ऑनलाईन उपस्थिती पद्धत यशस्वी झाल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. दरम्यान महाविद्यालयाच्या चुकीमुळे अनेक विद्यार्थ्यांना परिक्षेपासून वंचित राहावे लागल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. यानंतर मुंबई विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयांविरोधात महत्वाचा निर्णय घेतला आहे. 


अचूकतेसाठी ऑनलाईन अटेंडन्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील परीक्षेत काही विद्यार्थ्यांनी आसन क्रमांक व बारकोड चुकीचे लिहिले होते, यामुळे त्यांचे निकाल राखीव राहिले होते, नंतर ते जाहीर करण्यात आले. यावर उपाय म्हणून विद्यापीठाने या हिवाळी सत्रापासून विद्यार्थ्यांचे आसन क्रमांक, बारकोड व इतर माहिती असलेली पीडीएफ फाईल प्रत्येक परीक्षा केंद्रांना पाठविली. ती फाईल परीक्षा केंद्राने डाऊनलोड करून विद्यापीठाने दिलेल्या स्टिकरवर प्रिंट करून विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेवर चिकटविली. 


यावर क्यूआर कोड असल्याने विद्यार्थ्याची सर्व माहिती विद्यापीठास मिळेल आणि या कारणासाठी विद्यार्थ्यांचे निकाल राखीव राहणार नाहीत. तसेच विद्यार्थी परीक्षेत उपस्थित आहे का नाही यासाठी ऑनलाईन उपस्थिती पद्धत सुरू करण्यात आली. परीक्षा केंद्र विद्यार्थ्याची उपस्थिती विद्यापीठाच्या ऑनलाईन उपस्थिती प्रोग्राममध्ये नोंदवली गेली.यामुळे विद्यार्थी उपस्थित आहे का नाही ते तात्काळ विद्यापीठास समजले. तसेच यात कॉपी केसचीही नोंदणी करण्याची सुविधा आहे.


आज झालेल्या परीक्षेमध्ये 54 हजार 289 विद्यार्थी उपस्थित होते, 3 हजार 64 विद्यार्थी अनुपस्थित होते. .यावेळी 4 विद्यार्थ्यांची कॉपी केसमध्ये नोंद करण्यात आली.


2 महाविद्यालयावर होणार कारवाई 


आज झालेल्या परीक्षेमध्ये नवी मुंबईतील केएलई महाविद्यालयांनी 29 विद्यार्थ्यांचे आणि  मुंबईतील लीलावती लालजी दयाल रात्र महाविद्यालयातील 8 विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्जच विद्यापीठाकडे दाखल केले नव्हते. यामुळे हे 37 विद्यार्थी परीक्षेपासून वंचित होत होते. परंतु विद्यापीठांनी सदर विद्यार्थ्यांना ऐनवेळेस परीक्षा क्रमांक देऊन या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसविले. या दोन महाविद्यालयावर विद्यापीठाने नियमानुसार कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.


हिवाळी परीक्षेत अनेक नवीन बदल करण्यात आले आहेत. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज वेळेवर दाखल करावेत तसेच मुल्यांकनासाठी प्राध्यापक वर्ग तात्काळ उपलब्ध करावा, जेणेकरून परीक्षेचे निकाल निर्धारित वेळेत जाहीर करण्यात येतील, अशी प्रतिक्रिया मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी दिली.