मुंबई : दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर गणपती बाप्पांचं रविवारी विसर्जन करण्यात आलं. अनेक ठिकाणी होणारी गर्दी पाहता प्रशासनानं नियमावली आखून देत अनुचित प्रकार टाळण्याचं आवाहन केलं होतं. पण, तरीही काही ठिकाणी मात्र राज्यात गणेशोत्सवाला गालबोट लागलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत विसर्जनावेळी पाच मुलं बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. वर्सोवा जेट्टीतून दोन मुलांना वाचवण्यात आलं पण, बेपत्ता तिघांचा अद्यापही शोध सुरु आहे. वाचवण्यात आलेल्या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. 



मिरवणुकांवर बंदी असतानाही... 
विसर्जन मिरवणुकांवर बंदी असतानाही अनेक ठिकाणी लोकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. कोरोनाच्या धर्तीवर राज्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गणेश मूर्तींची उंची 4 फूटांवर आणण्याचं आवाहन केलं होतं. पण, सूत्रांच्या माहितीनुसार कोल्हापूरात 21 फूट गणेशमूर्तीनं सर्वांच्याच भुवया उंचावल्या. 


कोल्गहापुरातील शिवाजी चौक येथील तरुण मित्रमंडळानं नियमांचं उल्लंघन केल्याची बाब लक्षात येताच पोलीस आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. ज्यानंतर परिस्थिती हाताळण्यात आली. कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन सातत्यानं करण्यात आलेलं असतानाही नागरिकांकडून होणारी नियमांची पायमल्ली पाहता येत्या काळात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.