Mumbai Airport New flyover inauguration : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-2 च्या बाजूने पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाढणारी वाहतूक लक्षात घेता मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने (MMRDA) ने उभारलेला उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या उड्डाणपुलामुळे टर्मिनल-2 आणि टर्मिनल-1 कडून वांद्र्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसंच पश्चिम द्रुतगती महामार्गावर नंदगिरी गेस्ट हाऊसपासून होणाऱ्या वाहतूक कोंडीवरही कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गर्दीच्या वेळी विमानतळावरील टर्मिनल-१ व २ वर गाड्यांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी होते. या उड्डाणपुलामुळे ही वाहतूक कोंडी टळणार असून त्यामुळे प्रदूषण कमी होईल आणि इंधनाचीही बचत होणार आहे. हा उड्डाणपूल एका बाजूने जाण्यासाठीच असून त्यावर दोन मार्गिका आहेत. नंदगिरी गेस्ट हाऊसपासून ते भाजीवाडी येथील साईबाबा मंदिरापर्यंत 780 मीटरच्या या उड्डाणपुलामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-2 वरून वांद्र्याकडे जाणारी वाहतूक सुरळीत होईल. त्याशिवाय हा उड्डाणपूल सध्याच्या जुहू-विले पार्ले उड्डाणपुलाला समांतर आहे.


बांधकामाच्या अनोख्या पद्धती


हा उड्डाणपूल बांधण्यासाठी अभियांत्रिकीतील विविध अनोख्या पद्धती वापरण्यात आल्या आहेत. या उड्डाणपुलाचे गर्डर पोलाद आणि PSC पासून तयार झालेले आहेत. इंग्रजीतील T या अक्षराच्या उलट्या आकाराची पद्धत वापरून ७४ मीटर लांबीचं बांधकाम केलं गेलं. या अनोख्या पद्धतीमुळे पोलाद आणि PSC चे गर्डर कोणत्याही तात्पुरत्या आधाराविना बांधणं शक्य झालं. परिणामी या उड्डाणपुलाचं बांधकाम सुरू असताना वाहतुकीचा खोळंबा कमीत कमी झाला. तसंच या उड्डाणपुलाची लांबी आणि उंची नियंत्रित असल्याने बांधकामासाठी कमीत कमी भूसंपादन करावं लागलं.


मुंबईकरांना कसा फायदा होईल?


पश्चिम द्रुतगती महामार्गावरील टी-2 जंक्शनपासून वांद्रेपर्यंतची वाहतूक या उड्डाणपुलामुळे सुरळीत होणार आहे. टर्मिनल-2 जंक्शन ते वांद्रे आणि अंधेरी ते टर्मिनल-1 या दोन पट्ट्यांत नेहमी वाहतूक कोंडी होत होती. मात्र आता या उड्डाणपुलामुळे ही वाहतूक कोंडी सुटेल. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील भुयारी रस्त्यावर होणारी वाहनांची कोंडीही यामुळे टळणार आहे. परिणामी प्रवासाचा वेळ आणि इंधन या दोन्हींची बचत होणार आहे. 


वाहतूक सुरळीत झाल्यानंतर सिग्नलसाठीचा वेळही कमी होणार आहे. या उड्डाणपुलामुळे टर्मिनल-2 कडून वांद्रेकडे जाणाऱ्या वाहनांची क्षमताही वाढेल. हा उड्डाणपूल पश्चिम द्रुतगती महामार्गावरील या पट्ट्यातील वाहतूक कोंडीवर मोठा आणि कायमस्वरूपी उपाय ठरणार आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया


"यंदाचं वर्ष महाराष्ट्रासाठी आणि खासकरून मुंबई महानगर प्रदेशासाठी खूप खास आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक प्रकल्पांचं उद्घाटन झालं. तर पायाभूत सुविधांमधील रत्नं म्हणता येतील, अशा प्रकल्पांचे लोकार्पण सोहळेही थाटात पार पडले. मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधांचं जाळं अधिक सक्षम करण्यासाठी एमएमआरडीए सातत्याने प्रयत्न करत आहे. मुंबई महानगर प्रदेशाचं भवितव्य एमएमआआरडीएच्या च्या हाती सुखरूप आहे. या प्राधिकरणाच्या प्रत्येक प्रकल्पामुळे लाखो नागरिकांचं जीवन सुसह्य झालं आहे. त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकरांच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवणारा हा पूल प्रवाशांसाठी वाहतुकीसाठी खुला झाल्यामुळे मला प्रचंड आनंद होत आहे", अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.