Slow Poison... क्राईम स्टोरीपेक्षा डेंजर, बायकोने नवऱ्याचा परफेक्ट गेम केला पण...
Crime News : दोन मुलांची आई रोज पतीला `विष` देत होती. पतीच्या मृत्यूनंतर प्रियकरासोबत राहण्यासाठी पत्नीने हा कट रचला होता
Crime News : अनैतिक संबधांमुळे (extra marital affairs) गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनैतिक संबंधामध्ये अडसर ठरत असल्याने एका पत्नीनेच पतीचा काटा काढल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत समोर आलाय. मुंबईच्या (Mumbai Crime News) सांताक्रूझ भागात एका महिलेने आपल्या प्रियकरासोबत राहण्यासाठी पतीची अत्यंत निर्घुणपणे हत्या केलीय. पोलिसांनी या प्रकरणी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. पत्नी रोज आपल्या पतीच्या खाण्यात आर्सेनिक आणि थॅलियम मिसळून देत होती. स्लो पॉयझनिंगमुळे पतीला 3 सप्टेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर 17 दिवसांनी त्याचा मृत्यू झाला.
डॉक्टरांनीच पोलिसांत दिली तक्रार
या व्यक्तीच्या मृत्यूनंतर डॉक्टरांच्या मनात शंका उपस्थित झाली. डॉक्टरांनीच पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार दिली होती. यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 9 ने एक महिला आणि तिच्या प्रियकराला या प्रकरणी अटक केली. महिलेने प्रियकराच्या मदतीने 45 वर्षीय पतीची हत्या केली होती. पोलिसांनी दोन्ही आरोपींना 8 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
रक्ताची चाचणी केली आणि...
3 सप्टेंबर रोजी महिलेच्या पतीला मुंबईच्या एका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते. मात्र 19 सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. पण या व्यक्तीच्या मृत्यूनंतर पोलिसांच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या. उपचारादरम्यानच डॉक्टरांनी मृत व्यक्तीच्या रक्ताची हेवी मेटल टेस्ट केली होती. त्यानंतर डॉक्टरांना धक्का बसला. त्या व्यक्तीच्या रक्तात आर्सेनिक आणि थॅलियम प्रमाणाबाहेर असल्याचे चाचणीत आढळून आले. यामुळे डॉक्टरांनी आझाद मैदान पोलिसांत तक्रार दिली. आझाद मैदान पोलिसांनी सांताक्रूझ पोलिसांकडे या प्रकरणाचा तपास सोपवला.
खाण्यातून देत होती विष
गुन्हे शाखेने तपास करत पत्नीसह सर्वांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्या व्यक्तीच्या आहारासंबंधीची माहिती गोळा करण्याबरोबरच पत्नी आणि प्रियकरानेच प्लॅनिंग करून पतीला संपवण्यासाठी कट रचल्याचे समोर आले. बऱ्याच काळापासून पत्नी पतीच्या खाण्यात आर्सेनिक आणि थॅलियम मिसळून देत होती. हे धातू शरीराच्या आत रक्तात आधीपासूनच असतात, पण त्याचे प्रमाण जास्त झाले तर ते एकप्रकारे विष ठरू शकते. या व्यक्चीच्या बाबतीतही हेच घडले आणि त्याची प्रकृती सतत खालावत गेली.