Video :धक्कादायक! तपोवन एक्स्प्रेसमध्ये तरूणीला पाहून करत होता हस्तमैथुन
दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या लोकलमध्ये तरुणीला पाहून हस्तमैथुन करणाऱ्याला पोलिसांनी पकडल्यानंतर पुन्हा असा एक धक्कादायक प्रकार सीएसीटीवर तपोवन एक्स्प्रेसमध्ये घडला.
मुंबई : दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या लोकलमध्ये तरुणीला पाहून हस्तमैथुन करणाऱ्याला पोलिसांनी पकडल्यानंतर पुन्हा असाच एक धक्कादायक प्रकार सीएसीटीवर तपोवन एक्स्प्रेसमध्ये घडला.
दोन दिवसांपूर्वी मुंबईतल्या लोकलमध्ये एक तरूण हस्तमैथुन करत होता, पीडित तरूणीने यावरून हटकले असता तरूणीला बलात्कार करण्याची धमकी या तरूणाने दिली. बिचाऱ्या तरूणीने मदतीसाठी पोलिसांना फोन केला तर त्यांनी तिचीच खिल्ली उडवली. हे प्रकरण ताजे असताना आणखी एका २२ वर्षांच्या तरूणीला असाच वाईट अनुभव आला आहे.
ही तरूणी कामानिमित्त नाशिकला जात होती. यावेळी सीएसटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १३ वर उभ्या असलेल्या ‘तपोवन एक्स्प्रेस’मध्ये एक तरूण तिच्याकडे रोखून पाहत हस्तमैथुन करत होता.
सीएसटीवरून ही ट्रेन सकाळी सव्वासहाला निघते. ती वेळेच्या आधीच तिथे पोहोचली होती. ट्रेन सुटायला काही मिनिटांचा अवधी असल्याने ट्रेनमधले लाइट्स बंद होते. तेव्हा अंधार आणि प्लॅटफॉर्मवर कोणी नाही हे पाहून या तरूणाने अश्लिल चाळे करायला सुरूवात केली.
ही तरुणी मैत्रिणीची वाट बघत प्लॅटफॉर्मवरच उभी होती तेव्हा तिला पाहताच या तरूणाने पँटची चैन उघडून तिच्यादेखतच हस्तमैथुन करायला सुरूवात केली या प्रकारामुळे घाबरल्याने ती दुसरीकडे जाऊन उभी राहिली.
पण तिथेही त्याने तिचा पाठलाग केला आणि ती उभी असलेल्या बोगीत येऊन तो पुन्हा अश्लिल चाळे करू लागला. त्याने घृणास्पद कृत्य केले याचा कोणी विश्वास ठेवणार नाही म्हणून त्या तरुणीने व्हिडिओही काढला.
जे घडतंय ते खूपच चुकीचं आहे आणि याची माहिती पोलिसांना द्यायला हवी म्हणून ती या प्रकाराची माहिती देण्यासाठी पोलिसांकडे पोहोचली. पण तिला आलेला अनुभव हा यापेक्षाही वाईट होता. लोहमार्ग पोलिसांकडून तिला अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. माझ्यासोबत जे काही घडले त्याचा पुरावा म्हणून मी व्हिडिओ पोलिसांना दाखवला पण हे काय नेहमीचंच असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. एक पोलीस तर व्हिडिओ पाहून निघूनही गेले
“आपल्या आग्रहाखातर एक पोलीस तिथे आले, पण त्यांचा चेहराही फार त्रासलेला होता. मी या पोलिसांना काय घडलं ते सांगितलं. पण या तरूणाला पकडून त्याच्यावर कारवाई करणं तर दूरच राहिलं पण तुम्ही दुसरीकडे निघून जा, असा सल्ला या पोलिसाने दिला. त्याचं या ट्रेनमध्ये आरक्षण असेल तेव्हा यावर काहीच करता येऊ शकत नाही असं सांगून पोलीस निघून गेले आणि पोलिसांना पाहताच त्या तरुणानेही पळ काढला.”, असेही ती म्हणाली.
घडलेल्या संपूर्ण प्रकराचा व्हिडिओ तिने रेकॉर्ड केलाय. संबंधित तरुणी मूळची पुण्याची आहे. कामानिमित्त मुंबईत आलीय होती आणि तिला नाशिकला पुन्हा कामासाठी जायचे होते.