मुंबई : आपल्याला अनेकदा सांगण्यात येतं की, मोबाईल फोन चार्जिंग होत असताना फोनवर बोलू नये. अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. पण, चार्जिंग सुरु असताना फोन रिसिव्ह करणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील वांद्रे परिसरात राहणा-या २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. फोन चार्जिंग सुरु असताना मोबाईलवर आलेला फोन रिसिव्ह केल्याने त्याला शॉक लागला. 


मिड-डे या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, २८ वर्षीय तपन गोस्वामी हा आपल्या मित्रासोबत वांद्रे येथे राहत होता. तो पश्चिम बंगालचा राहणारा होता. मंगळवारी तपनचा मित्र संजय त्याला भेटण्यासाठी घरी आला.


संजयने तपनच्या घरात प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही क्षणातच तो घरातून ओरडत बाहेर पडला. त्यानंतर तपनच्या घाबरलेल्या मित्राने आरडाओरड करुन शेजा-यांना बोलवलं. तपनला तात्काळ जवळच्या भाभा रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.


शॉक लागल्याने तपनचा मृत्यू झाला, अशी माहिती भाभा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली असल्याचं वृत्त मिड-डे ने दिलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपनचा मोबाईल ताब्यात घेतला असून अधिक तपास सुरु आहे.